करोनाचा संसर्ग झालेल्यांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीची मदत घेतली जात आहे. दरम्यान प्लाझ्मा थेरपीमुळे मृत्यूचा धोका अजिबात कमी होत नाही असा निष्कर्ष एम्सने काढला आहे. एम्सकडून प्लाझ्मा थेरपी उपचार किती प्रभावी आहे याची तपासणी करण्यासाठी चाचणी करण्यात आली. यावेळी प्लाझ्मा थेरपीमुळे करोना रुग्णांचा मृत्यूचा धोका अजिबात कमी होत नाही असं समोर आल्याचं एम्सने सांगितलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्स रुग्णालयात १५-१५ रुग्णांच्या दोन गट करत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यामधील एका ग्रुपला प्रमाणित उपचारांसोबत प्लाझ्मा थेरपी तर दुसऱ्या ग्रुपला फक्त प्रमाणित उपचार देण्यात आले. मात्र दोन्ही गटांमधील मृत्यूसंख्या सारखीच राहिली. सोबतच दोन्ही गटातील रुग्णांच्या प्रकृतीतही काही खास सुधारणा झाली नाही.

“पण हा फक्त प्राथमिक निष्कर्ष असून एखाद्या विशेष समूहाला प्लाझ्मा थेरपीचा फायदा मिळतोय का हे तपासण्यासाठी अजून सविस्तर विश्लेषण कऱण्याची गरज आहे,” असं डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सुरक्षा तसंच करोना रुग्णाला गरज असलेली अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये आहे की नाही याचीही पाहणी करणं गरजेचं असल्याचं अधोरेखित केलं.

एम्सच्या मेडिकल विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक मोनिष सोनेजा यांनी बुधवारी वेबिनारमध्ये बोलताना प्लाझ्मा सुरक्षित असून फक्त कार्यक्षमता काळजीचा विषय असून अद्याप आम्हाला हिरवा कंदील मिळाला नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा सामंजस्याने तसंच नियमांचं पालन करुन वापर करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?
यात विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या अन्य रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्यात अ‍ॅण्टिबॉडीजदेखील असतात. त्या शरीरावर होणाऱ्या बाह्य़ आक्रमणाला परतवून लावण्यात आघाडीवर असतात. एकदा तसं झालं की आपल्या रक्तपेशी पुन्हा त्याच प्रकारचं आक्रमण झालं तर आधीचं आक्रमण लक्षात ठेवून वेळीच शत्रूला ओळखतात आणि त्याचा प्रतिकार करतात.