दिल्लीमध्ये कायमचा लॉकडाउन ठेऊ शकत नाही असं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी यासोबत दिल्लीत निर्बंध शिथील करण्याचे संकेत दिले आहेत. “कायमचा लॉकडाउन हा पर्याय नाही. काळजी घेत आपल्याला पुढील वाटचाल करावी लागणार आहे,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं असून दिल्ली करोनाच्या चार पावलं पुढे असल्याचा दावा त्यांनी केला आहे

करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिल्ली देशात तिसऱ्या क्रमांकावर असून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. “करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं मान्य आहे. पण आपण घाबरण्याची गरज नाही. करोनाबिधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ झाली आणि रुग्णालयातील बेडची कमतरता भासू लागली तरच दिल्लीमधील परिस्थिती माझ्यासाठी चिंताजनक असेल,” असं अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान सांगितलं आहे.

आणखी वाचा- दिल्ली करोनाच्या चार पावलं पुढे, अरविंद केजरीवालांचा दावा

“एकूण रुग्णांपैकी २१०० रुगण रुग्णालयात दाखल असून इतर रुग्ण घरी उपचार घेत आहेत. ६५०० बेड सध्या तयार असून ९५०० बेड पुढील आठवड्यात तयार होतील,” अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. “अनेक लोक बरे होत असून, ते आपल्या घऱी आहेत. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी लोकांना आता करोनासोबत जगायला शिकलं पाहिजे असं म्हटलं होतं. दिल्लीत करोनाचे १७ हजाराहून जास्त रुग्ण असून ३९८ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाची परिस्थिती हाताळण्यावरुन टीका करणाऱ्यांना उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी हे घाणेरडं राजकारण करण्याची वेळ नाही, देशासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे असं आवाहन केलं आहे.