अमेरिकेत करोनाची लागण झालेल्या सर्वात पहिल्या श्वानाचा मृत्यू झाला आहे. नॅशनल जिओग्राफीक मॅगजिनने यासंबंधी वृत्त दिलं आहे. करोनाची लागण झाल्यानंतर माणसांमध्ये दिसणारी लक्षणं या श्वानामध्ये दिसू लागली होती. एप्रिल महिन्यात सात महिन्यांचा जर्मन शेफर्ड बडी आजारी पडला होता. त्याचवेळी त्याचे मालक रॉबर्ट करोनाचे उपचार घेतल्यानंतर बरे होत होते.

श्वानाला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. यानंतर त्याची प्रकृती अजून खालावली. त्याने रक्ताच्या उलट्या केल्या, तसंच चालूही शकत नव्हता. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या श्वानाला करोना झाला असेल असा विचारही आम्ही केला नव्हता. रॉबर्ट यांना मात्र नंतर त्याला करोना झाल्याची शंका आली. पण करोनामुळे परिसरातील सर्व प्राण्यांची रुग्णालयं बंद होती.

आणखी वाचा- आता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; ट्रम्प यांचं करोनामुक्त रुग्णांना आवाहन

अखेर एका दवाखान्यात नेलं असता त्याला करोना झाल्याचं निष्पन्न झालं. यावेळी श्वानाला कॅन्सरचं असल्याचंही निदान झालं. यामुळे माणसांप्रमाणे आधीपासून अनेक व्याधी असणाऱ्या जनावरांनाही करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली. पण याबाबत आरोग्य अधिकारी किंवा प्राण्यांचे डॉक्टरही कुटुंबाला अधिक माहिती देऊ शकत नव्हते. कारण पहिल्यांदाच एखाद्या जनावराला करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं.

आणखी वाचा- जगभरात करोनारुग्णांची संख्या १ कोटी ७० लाखांवर

श्वानाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी आम्हाला याबद्दल काहीच माहिती किंवा अनुभव नसल्याचं म्हटलं. याशिवाय स्थानिक प्रशासनदेखील या केसमध्ये जास्त रस दाखवत नव्हतं. प्रशासनाने शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेईपर्यंत श्वानावर अंत्यसंस्कार झाले होते.

जागतिक आरोग्य संघटनेने जनावरांमधून माणसांपर्यंत संसर्ग पोहोचत नाही असं सांगितलं आहे. पण त्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे असं अमेरिकेतील डॉक्टरांचं म्हणणं आहे. अमेरिकेत आतापर्यंत १२ श्वान आणि १० मांजरींना करोनाची लागण झालेली आहे.