केंद्र सरकारने तात्काळ प्रभावाने अफगाणिस्तान, फिलीपाईन्स आणि मलेशिया या देशातील प्रवाशांना भारतात प्रवेशबंदी लागू केली आहे. करोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कालच केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने युरोपियन युनियन, टर्की आणि युनायटेड किंगडममधून येणाऱ्या प्रवाशांच्या भारत प्रवेशावर बंदी घातली होती.

याआधी ११ आणि १६ मार्च ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली होती. आता पुन्हा नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीननंतर या देशातून एकही विमान भारतात येण्यासाठी उड्डाण करणार नाही. तात्पुरत्या स्वरुपाचे हे निर्देश असून ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे. त्यानंतर फेर आढावा घेण्यात येईल. भारतात सध्या करोना व्हायरसचे १२५ रुग्ण असून महाराष्ट्रात सर्वाधिक ३९ रुग्ण आहेत.