करोनाच्या पार्श्वभुमीवर चीन आणि अमेरिकेत गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु असून शीतयुद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे भारत आणि अमेरिकेतील संबंध घट्ट होत असल्याचं चित्र आहे. यामुळे चीनने भारताला अमेरिका आणि आपल्यात सुरु असलेल्या शीतयुद्धापासून दूर रहा असा इशाराच भारताला दिला आहे. चीन सरकारचं मुखपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्समध्ये भारताला सल्ला देत सांगण्यात आलं आहे की, अमेरिका आणि चीनमधील वादात भारत दूर राहिला तर बरं होईल.

यावेळी चीनने भारताला अप्रत्यक्ष धमकी देत भारताने अमेरिकेचा सहकारी होऊन जर चीनविरोधात काहाही कारवाई केली तर करोना महामारीच्या या परिस्थितीत आर्थिक परिणाम वाईट होतील असं म्हटलं आहे. भारताने अमेरिका आणि चीनमधील शीतयुद्धापासून दूर राहावं जेणेकरुन दोन्ही देशांमधील व्यवहारिक संबंध पुढेही सुरु राहतील असं चीनने म्हटलं आहे. चीनने भारतासोबतचे व्यवहारिक संबंध चांगले ठेवणं आपलं लक्ष्य असल्याचंही सांगितलं आहे. यामुळे चीन यापुढेदेखील भारतात गुंतवणूक कऱण्यासाठी दोन्ही देशांमधील संबंध चांगले ठेवण्यास उत्सुक असल्याचंही चीनने सांगितलं आहे.

चीनने यावेळी भारताला इशारा देताना म्हटलं आहे की, कोणत्याही परिस्थितीत राजकीय कारणांमुळे भारताला आर्थिक परिणाम सहन करावे लागू नयेत यासाठी चीन प्रयत्न करत आहे. यामुळे मोदी सरकारला भारत-चीन संबंधांबद्दल सकारात्मक विचार करत पुढील वाटचाल केली पाहिजे.

चीनने भारताला फक्त आर्थिक परिणाम भोगण्याची धमकी दिलेली नाही तर करोनासंबंधी वाढत्या प्रकरणांमध्ये लॉकडाउन हटवण्यावरुन टीकाही केली आहे. दरम्यान, भारत आणि चीनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आपण तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. चीनच्या सरकारी माडियाने यावर बोलताना, भारत आणि चीनला हा मुद्दा सोडवण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची गरज नसल्याचं सांगितलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधी केलेल्या ट्विटला चीनकडून अधिकृत उत्तर देण्यात आलेलं नाही. ग्लोबल टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात चीनने म्हटलं आहे की, दोन्ही देशांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीची गरज नाही. भारत आणि चीन द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून मुद्दा सोडवण्यात सक्षम आहे. शांतता बिघडवण्याचं संधी शोधणाऱ्या अमेरिकेपासून दोन्ही देशांनी सावधान राहिलं पाहिजे.