करोनाबाधित रुगावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच जमावाने त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर कुटुंबाला मृतदेह अर्ध्या जळालेल्या अवस्थेत सोडूनच तेथून पळ काढावा लागला. अखेर प्रशासनाने मध्यस्थी करत प्रोटोकॉलप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडले. जम्मूमधील दोडा जिल्ह्याचे रहिवासी असणाऱ्या ७२ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. करोनामुळे जम्मूमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“आम्ही महसूल अधिकारी आणि वैद्यकीय पथकासोबत अंत्यसंस्कार करत होतो. अंत्यसंस्कार सुरु असतानाच तेथील काही स्थानिक लोक आले आणि अंत्यसंस्कार रोखण्यास सुरुवात केली,” अशी माहिती मृत व्यक्तीच्या मुलाने दिली आहे.

अंत्यसंस्काराला मृत व्यक्तीचे फक्त जवळचे नातेवाईक पत्नी आणि दोन मुलं उपस्थित होते. जमावाने हल्ला करत दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने जीव वाचवण्यासाठी सर्वांना मृतदेह अर्धा जळालेल्या अवस्थेत सोडून रुग्णवाहिकेतून पळ काढावा लागला. “अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आपल्या घऱी नेण्यासाठी आम्ही सरकारकडून रितसर परवानगी घेतली होती. सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं. अंत्यसंस्कारात कोणतीही बाधा येणार नाही असं आश्वासन आम्हाला दिलं गेलं होतं,” अशी माहिती मुलाने दिली आहे.

घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांना कोणतीही मदत न केल्याचा आरोप मुलाने केला आहे. “रुग्णवाहिका चालक आणि रुग्णालयाच्या इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला फार मदत केली. मृतदेह घेऊन पुन्हा रुग्णालयात जाण्यासाठी त्यांनी मदत केली. मागील अनुभव लक्षात घेता करोनाबाधित रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी सरकारने योग्य तयारी केली पाहिजे,” असं मृत व्यक्तीच्या मुलाने म्हटलं आहे.

अखेर भागवती नगर परिसरात मृतदेह नेण्यात आला आणि वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोणतीही अडचण होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.