करोनाचा फैलाव जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये झाला आहे. स्पेन, इटली, अमेरिकेसारख्या देशांमध्ये करोनामुळे दहा हजारहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. न्यूझीलंडमध्येही करोनाचे ९६९ रुग्ण अढळले असून देशात करोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी काही भागांमध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाउनची घोषणा केलेली असतानाच देशाचे आरोग्यमंत्र्यांनीच नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंतप्रधानांनी आरोग्यमंत्र्यांवर कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांनी लॉकडाउनचे नियम तोडल्याप्रकरणी स्वत:ला ‘इडियट’ असं म्हटलं आहे. इतकच नाही त्यांनी या प्रकरणात आपला राजीनामा पंतप्रधान आर्डेन यांच्याकडे सोपवला होता. मात्र देशात करोनाचे संकट असतानाच आरोग्यमंत्र्यांचा राजीनाम स्वीकारण्यास पंतप्रधानांनी नकार दिला आहे. असं असलं तरी याप्रकरणात आरोग्यमंत्री क्लार्क यांच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. देशातील करोना संसर्गासंदर्भातील सगळी सुत्रे क्लार्क यांच्या हाती असल्याने त्यांचे मंत्रीपद वाचले असले तरी त्यांना डिमोट (पदावनतीची कारवाई) करण्यात आलं आहे. आता तुम्ही म्हणाल की अगदी पद जाण्यापर्यंतची कोणती चूक आरोग्यमंत्र्यांनी केली होती. तर लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत क्लार्क हे स्वत:च्या कुटुंबासहित किनारपट्टी भागातील रस्त्यावर २० किलोमीटरच्या लाँग ड्राइव्हला गेले होते.

क्लार्क यांनी आपली चूक मान्य केली आहे. आपल्याकडून असं व्हायलं नको होतं असंही त्यांनी म्हटलं आहे. “एकीकडे देशातील जनतेला आम्ही ऐतिहासिक त्याग करण्याचं आवाहन करत घरात बसण्यास सांगत असतानाच मीच सरकारला अडचणीत आणणारे कृत्य केलं आहे. मी वेड्यासारखं वागलो आहे. त्यासाठी लोक माझ्यावर संतापले आहेत याची मला जाणीव आहे,” अशा शब्दांमध्ये क्लार्क यांनी घडलेल्या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भातील वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

“क्लार्क यांनी केलेलं कृत्यू चुकीचं आहे. त्यासाठी कोणतही स्पष्टीकरण देता येणार नाही. मात्र सध्या करोनाच्या संकटाला तोंड देण्याला आमच्या सरकारचं प्राधान्य आहे. त्यामुळेच आरोग्य क्षेत्रामध्ये मोठा गोंधळ निर्माण होईल असा निर्णय घेणे परवडण्यासारखं नाही. या एकमेव कारणासाठी क्लार्क यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही”, असं आर्डेन यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus new zealand pm jacinda ardern demotes health minister david clark for violating lockdown rules scsg
First published on: 08-04-2020 at 13:26 IST