टोकियो  : जपानमध्ये नांगर टाकून असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर करोनाचा संसर्ग झालेल्या आठ भारतीयांची प्रकृती आता सुधारत आहे. तंदुरुस्त असलेल्या रुग्णांची शेवटची तुकडी शुक्रवारी विलगीकरण कालावधी संपल्यानंतर उतरण्याच्या टप्प्यात आहे. डायमंड प्रिन्सेस हे क्रूझ जहाज टोकियोतील योकोहामा बंदरावर असून त्यावर ३७११ प्रवासी होते त्यातील काही आता विलगीकरण काळ संपल्याने उतरून गेले आहेत. हाँगकाँगच्या एका व्यक्तीला विषाणूची लागण झाली होती तो मध्येच उतरून गेला आहे. एकूण १३८  भारतीय जहाजावर असून त्यात सहा प्रवासी आहेत. भारतीय दूतावासाने  म्हटले आहे की, नव्याने कुठल्याही भारतीय रुग्णाची चाचणी सकारात्मक आलेली नाही. ज्या आठ भारतीयांवर उपचार करण्यात आले त्यांची प्रकृती सुधारत आहे. भारतीय दूतावासाने सांगितले की, जपानी अधिकारी व जहाज कंपनीशी भारतीय प्रवासी  सुखरूप परतण्याबाबत समन्वय सुरू आहे. या जहाजावर सीओव्हीआयडी १९ विषाणूचे  ६३४ रुग्ण सापडले होते. दोन प्रवासी यात मरण पावले. शुक्रवारी आणखी ४०० प्रवासी उतरण्याच्या तयारीत आहेत कारण त्यांचा विलगीकरण काळ संपला आहे.