एअर इंडियाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमधून लुधियानाला गेलेल्या अलायन्स एअरच्या विमानातील एक प्रवासी करोनाग्रस्त असल्याचे अढळून आलं आहे. ही माहिती समोर आल्यानंतर ४१ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यामध्ये या व्यक्तीबरोबरचे ३५ सहप्रवासी आणि विमानाच्या वैमानिकांसहीत पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर विमानसेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. २५ मे पासून देशांतर्गत विमान प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. याच दिवशी दिल्लीवरुन लुधियानाला आलेल्या प्रवाशाची करोना चाचणी सकारात्मक आल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या कंपनीचा भाग असणाऱ्या अलायन्स एअरच्या विमानातून प्रवास करताना या व्यक्तीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे सांगण्यात येत आहे.

“एआय९आय ८३७ दिल्ली-लुधियाना विमानाने २५ मे रोजी प्रवास केलेल्या प्रवाश्याच्या करोनाचा चाचणीचे निकाल सकारात्मक आहे. प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी ही चाचणी सकारात्मक आल्याचे कंपनीला कळवण्यात आलं. या विमानाने प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे,” अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली. हवाई वाहतूक मंत्रालय आणि विमान वाहतूक संचालनालयाच्या (Director General of Civil Aviation म्हणजेच D.G.C.A.) करोनासंदर्भातील सर्व सूचनांचे आम्ही पालन करत असल्याचेही एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी इंडिगोच्या विमानाने २५ मे रोजी प्रवास करणारा प्रवासी करोना पॉझिटीव्ह अढळल्याची माहिती इंडिगोने दिली होती. इंडिगोच्या ६ ई ३८१ या विमानाने प्रवाशाने चेन्नई ते कोइम्बतूर असा प्रवास केला होता.