देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या एक हजारहून अधिक झाली आहे. दिवसोंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. हाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी २६ तारखेपासून देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. हे देशव्यापी लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. २१ दिवसांच्या या लॉकडाउनदरम्यान सामान्यांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. घरी राहा सुरक्षित राहा असा संदेश सरकारी यंत्रणांमार्फत दिला जात आहे. यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. घरी राहण्यासंदर्भातील अनेक हटके पोस्ट अगदी पोलिसांपासून सामान्यांपर्यंत अनेकजण शेअर करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही एका लहान मुलीचा गोंडस फोटो शेअर करत भारतीयांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवार २९ मार्च) ‘मन की बात’द्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. , “करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो,” असं सांगत दिलगीरी व्यक्त केली. या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घरातच थांबण्याचं आवाहन मोदींनी पुन्हा एकदा देशातील जनतेला केलं. त्यानंतर त्यांनी दुपारी दीडच्या सुमारास आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन एका छोट्या मुलीचा हातात पोस्टर असणारा एक फोटो शेअर करत भारतमातेसाठी घरात राहा असा संदेश दिला.

मोदींनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये एक कानटोपी घातलेली गोंडस लहान मुलगी हातामध्ये भारतीयांना घरातच थांबावं असा संदेश देणारा कागदी फलक घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. “जर मी आईच्या गर्भामध्ये नऊ महिने राहू शकते. तर तुम्ही भारतमातेसाठी २१ दिवस घरात नाही राहू शकत?”, अशा ओळी यावर लिहिण्यात आल्या आहेत. ‘हा फोटो मनोरंजक आणि भावना अगदी महत्वाच्या आहेत,’ असं कॅप्शन मोदींनी दिलं आहे.

या फोटोला तासाभरामध्ये आठ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे.