करोनाने जगभरामध्ये थैमान घातलं आहे. सौदी अरेबियामध्येही दोन हजार ४०० हून अधिक जणांना करोनाची लागण झाली असून येथे आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येथील सरकारने सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशाच्या वायव्येकडे हील भागामधील मॉलमधील रस्त्यावर असणाऱ्या शॉपिंग ट्रॉलींवर एक व्यक्ती थुंकताना रंगेहाथ पकडली गेली आहे. थुंकी आणि संसर्गामधून पसरणाऱ्या करोनामुळे देशामध्ये शहशतीचं वातावरण असतानाच अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी या व्यक्तीला अटक करण्यात आली असून सौदीमधील कायद्यानुसार या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भातील वृत्त गल्फ न्यूजने दिलं आहे.

ही व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामागे या व्यक्तीचा काय हेतू होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचे गल्फ न्यूजने म्हटलं आहे. देशामध्ये करोनाचे संकट असताना अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत धोक्याचे असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. “सध्याची परिस्थिती पाहता या व्यक्तीने केलेला गुन्हा हा येथील धार्मिक कायदा आणि न्यायव्यवस्थेनुसार मोठा गुन्हा आहे. यासाठी त्याला मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते,” असं सुत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे.

“या व्यक्तीने केलेलं कृत्य हे भ्रष्टाचारामध्ये मोडते. मुद्दाम करोनाचा विषाणू पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून सामाजाला घाबरवण्याचा आणि चिंता निर्माण करण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला आहे,” असंही सुत्रांनी सांगितलं. सौदीचा समावेश हा जगातील सर्वाधिक कठोर शासन असणाऱ्या देशांमध्ये केला जातो. येथे सार्वजनिक आरोग्याल्या प्रथम प्राधान्य दिलं जातं. त्यामुळेच या देशामध्ये रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे यासारख्या आपल्याकडे शुल्लक मानल्या जाणाऱ्या गोष्टींसाठीही जबर दंडवसुली केली जाते. त्यातच करोनाचा पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने आता या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सौदीने हळूहळू आपल्या देशामधील वेगवेगळ्या भागांमध्ये लॉकडाउन करण्यास सुरुवात केली आहे. जेदाह शहराबरोबर आजूबाजूच्या सात शहरांमध्ये शनिवारपासून लॉकडाउन करण्यात आलं आहे.