अमेरिकेबरोबरच जगभरातील ८० हून अधिक कोट्याधीशांनी सोमवारी एक खुलं पत्र प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये या श्रीमंत व्यक्तींनी जगभरातील सरकरांनी सुपर रीच म्हणजेच अतिश्रीमंतांकडून जास्त प्रमाणात कर घ्यावा अशी मागणी केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी यामुळे मदत होईल असंही या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. या ८० कोट्याधीसांच्या गटाचे नाव ‘मिलेनियर्स ऑफ ह्युमॅनिटी’ म्हणजेच ‘मानवतेसाठी करोडपतींची साथ’ असं आहे. श्रीमंत लोकांकडून तातडीने अधिक कर आकारण्यास सुरुवात करण्यात यावी. ही कर वसुली तातडीने, उघडपणे आणि कायमस्वरुपी असावी असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. करोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. जगभरामध्ये बेरोजगारी वाढली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आता या श्रीमंत व्यक्तींनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.

श्रीमंतांकडून अधिक कर घ्यावा अशी मागणी करणारे पत्र सरकारला पाठवण्यात आलं आहे. या पत्रावर सह्या करणाऱ्यांमध्ये बेन अॅण्ड जेरीज आइस्क्रीम कंपनीचे सह संस्थापक जेरी ग्रीनफील्ड, स्क्रीन रायटर रिचर्च कर्टिस आणि चित्रपट निर्माते एबिलेग डिझनी यांचा समावेश आहे. याचबरोबरच अमेरिकेतील उद्योजक सिडनी टोपोल आणि न्यूझीलंडचे व्यवसायिक स्ट्रीफन टिंडल यांचाही समावेश आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द गार्डियन’ने दिलं आहे.

काय आहे या पत्रामध्ये?

“करोनाने जगाला आपल्या विळाख्यात घेतलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या संकटाला तोंड देण्यासाठी आमच्यासारख्या श्रीमंत व्यक्तींची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आम्ही या संकटाच्या काळामध्ये करोना योद्ध्यांप्रमाणे कोणावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात नाही आहोत किंवा एखाद्या रुग्णवाहिका चालवण्याचे कामही आम्ही करत नाही. किंवा आम्ही एखाद्याला दरवाजापर्यंत फूड डिलेव्हरी देत नाही अथवा किराणाच्या दुकानात कामही करत नाही आहोत. मात्र आमच्याकडे खूप सारा पैसा आहे. याच पैशाची आता सर्वाधिक गरज येणाऱ्या काळामध्ये या संकटाला तोंड देण्यासाठी लागणार आहे. पुढील काही काळ ही आर्थिक गरज कायम राहणार आहे,” असं या पत्रामध्ये म्हटलं आहे.

म्हणून हे पत्र महत्वाचे…

लवकरच जी २० देशांच्या अर्थमंत्र्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. सध्याच्या संकटाच्या काळात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे अनेक देश सध्या श्रीमंतांकडून अधिक कर घेण्याच्या विचारात आहेत. म्हणूनच या पत्राला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. यूनायडेट किंग्डममधील इन्स्टिटयूट ऑफ फायनॅनशिअल स्टडीजमधील अभ्यासकांच्या मते आता अनेकांना अधिक कर द्यावा लागणार आहे. यामध्ये केवळ अतिश्रीमंतांचा समावेश असणार नाही तर इतर श्रीमंतांनाही अधिक कर द्यावा लागण्याची शक्यता आहे.

हे देश वाढवणार कर

याच महिन्यामध्ये स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेजी यांनी अधिक कर आकारण्याचा सरकार विचार करत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. रशियाही जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींकडून अतिरिक्त करण्याचा विचार करत आहे. सौदी अरेबियाने विक्री करामध्ये वाढ केली आहे. कच्च्या तेलाची मागणी कमी झाल्यानंतर ही करवाढ करण्यात आली आहे.

‘मिलेनियर्स ऑफ ह्युमॅनिटी’च्या वतीने हे पत्र प्रसिद्ध करणाऱ्यांमध्ये ऑक्सीफॅम, टॅक्स जस्टीस युके आणि अमेरिकेतील सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या लोकांचा समावेश आहे. या गटाचे नाव पॅट्रीऑटीक मिलेनिर्स म्हणजेच देशभक्त कट्याधीश असं आहे. करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी श्रीमंतांकडून अधिक कर आकारण्याची मागणी जोर धरत आहे.

श्रीमंतांची संपत्ती वाढली

करोनाच्या संकटकाळामध्ये श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांची संपत्ती ७५ अरब डॉलर्सने वाढली आहे. सध्या त्यांच्याकडे १८९ अरब डॉलर एवढी संपत्ती आहे. सध्या ते अल्ट्रा वेल्दी म्हणजेच खूपच जास्त श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये असणाऱ्या व्यक्तींची संख्या पाच लाखांहून अधिक आहे. हा आकडा आइसलॅण्ड आणि माल्टासारख्या देशांमधील लोकसंख्येहूनही अधिक आहे.