अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा निर्वाळा

भारताने विकसित केलेली कोव्हॅक्सिन ही लस करोनाच्या अल्फा व डेल्टा उपप्रकारांवर उपयोगी असल्याचा निर्वाळा अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने दिला आहे. ही लस भारतीय वैद्यक संशोधन परिषद व राष्ट्रीय विषाणू संस्था यांनी तयार केली आहे.

राष्ट्रीय आरोग्य संस्थेने म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या लोकांचा रक्तद्रव घेऊन त्याचा अभ्यास केला असता त्यात बी १.१.७ (अल्फा) व बी १.६१७ (डेल्टा) या विषाणूंच्या विरोधात प्रतिपिंड तयार झालेले दिसले. हे विषाणू अनुक्रमे ब्रिटन व भारत येथे तयार झाले होते. पण अजूनही डेल्टा प्लस या विषाणू उपप्रकारावर लशी कितपत उपयोगी आहेत याचा खुलासा झालेला नाही.

अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेचे भारताशी मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे. या संस्थेने म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन लस भारतात व इतरत्र २.५ कोटी लोकांना देण्यात आली असून त्यात अमेरिकेने पुरवलेले औषधी घटक वापरण्यात आले होते. कोव्हॅक्सिनमध्ये निष्क्रिय केलेला सार्स सीओव्ही २ विषाणू वापरण्यात आला असून शरीरात गेल्यानंतर त्यांची संख्या वाढत नाही तरी प्रतिकारशक्ती प्रणालीला खऱ्या विषाणूशी लढण्याचे प्रशिक्षण मिळते. या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत असे दिसून आले की, ही लस सुरक्षित व सुसह््य आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत असे दिसून आले की, कोव्हॅक्सिन परिणामकारक व सुरक्षित आहे. दरम्यान तिसऱ्या चाचण्यातील निष्कर्षानुसार कोव्हॅक्सिन लस ७८ टक्के प्रभावी आहे. गंभीर करोना रुग्णांत ती १०० टक्के प्रभावी असून त्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रकार टळतात.

लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये या लशीची परिणामकारकता ७० टक्के आहे. दरम्यान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इनफेक्शियस डिसीजेस या संस्थेचे अँथनी फौची यांनी सांगितले की, करोनाच्या साथीला जागतिक पातळीवर प्रतिसादाची गरज आहे. अमेरिकेच्या सहकार्यातून भारताला या लशी तयार करण्यास मदत झाली आहे.