19 January 2021

News Flash

ब्रिटन : करोना रुग्णांना हॉस्पिटलमधून हॉटेलमध्ये शिफ्ट करणार

डिसेंबर महिन्यात करोनाच्या नियमांमध्ये देण्यात आलेली सूट

संग्रहित छायाचित्र/रॉयटर्स

करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने  इंग्लंडमधील आरोग्य यंत्रणेवर दिवसोंदिवस ताण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वच रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आता सरकार करोनाबाधितांना रुग्णालयांमधून मोठ्या हॉटेलमध्ये हलवण्याचा विचार करत आहे. आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. स्काय न्यूजच्या वृत्तानुसार राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी सरकार नवीन पर्यायांचा विचार करत आहे. यामध्ये रुग्णांना हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्याच्या पर्यायावरही विचार सुरु असल्याचे हॅनकॉक यांनी म्हटलं आहे.

आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी करण्यासाठी जो कोणता पर्याय निवडला जाईल तो वैद्यकीय दृष्ट्या रुग्णांसाठी फायद्याचा असेल तरच विचार करण्यात येईल असंही हॅनकॉक यांनी स्पष्ट केलं आहे. काही रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करुन घेण्याइतकी गंभीर अवस्था नसते. म्हणजेच अशा रुग्णांना सतत रुग्णालयातील बेडवर पडून राहण्याची गरज नसते. अशा करोना रुग्णांना हॉटेलमध्ये हलवण्यात येऊ शकतं असं हॅनकॉक म्हणाले.

ब्रिटनमध्ये करोनामुळे आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती सध्या खूपच चिंताजनक आहे. करोनामुळे येथे ८३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारी पाहिल्यास सध्या ब्रिटन हा संपूर्ण युरोपमध्ये करोनाचा सर्वाधिक फटका बसलेला देश आहे. करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांमध्ये खाटा कमी पडत आहेत. इंग्लंडमधील रुग्णालयांमध्ये सध्या एप्रिलच्या तुलनेत ५५ टक्के अधिक करोना रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

डिसेंबरमध्ये करोनाच्या नियमांमध्ये सूट देण्यात आल्यानंतर आणि करोनाचा नवीन प्रकार (स्ट्रेन) सापडल्याने ब्रिटनमधील करोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ झालीय. रुग्णालयांमध्ये करोनावरील उपचारांसाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी क्रिस व्हिट्टी यांनी देश करोना संकटाला तोंड देताना सर्वात वाईट काळामधून जात असल्याचे म्हटले आहे. दिवसोंदिवस ब्रिटनमधील परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचेही व्हिट्टी यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी याहून वाईट परिस्थिती फेब्रुवारी महिन्यामध्ये असू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये करोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 7:57 am

Web Title: covid 19 uk eyeing plans to move hospital patients into hotels scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाभियोगाची कारवाई सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले…
2 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर
3 ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाबाबत रिपब्लिकन पक्षात मतभेद
Just Now!
X