देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोटच बघायला मिळाला. एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा दुर्दैवी जागतिक विक्रमही भारताच्या नावावर नोंदवला गेला. मात्र, आता हळूहळू रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. तर करोनामुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असं असलं तरी करोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे देशावरील चिंतेचं ढग अद्याप कायम आहे. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पार गेली असून, गेल्या २४ तासांत ४,४५४ रुग्णांना करोनामुळे प्राण गमावावे लागले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवार दिवसभरातील करोना आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत दोन लाख २२ हजार ३१५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आकडेवारी घसरत असल्याचं यातून दिसून येत असून, त्यात आणखी एक दिलासा म्हणजे याच कालावधी देशात तीन लाख २ हजार ५४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या २७ लाख २० हजार ७१६ वर आली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २,६७,५२,४४७ इतकी झाली आहे.

मृत्यूचं थैमान थांबेना…

नवीन करोनाबाधितांची संख्या आणि करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासा देणारी असली, तरी देशात दररोज मृत्यू होत असलेल्या रुग्णांची संख्या झोप उडवणारी आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून दररोज चार हजारांच्या आसपास मृत्यू नोंदवले जात असून, गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. चार हजार ४५४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाख तीन हजार ७२० इतकी झाली आहे.

२४ तासांत ‘या’ पाच राज्यांत सर्वाधिक रुग्णांची नोंद

सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात रविवारी सर्वाधिक रुग्ण तामिळनाडूमध्ये आढळून आले. तामिळनाडूत ३५ हजार ४८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यापाठोपाठ महाराष्ट्र २६ हजार ६७२, कर्नाटक २५ हजार ९७९, केरळ २५ हजार ८२० आणि आंध्र प्रदेशात १८ हजार ७६७ रुग्ण आढळून आले आहेत.