भारतच नाही तर संपूर्ण जगाला करोना संकटाचा विळखा बसला आहे. करोनावरची लस नेमकी कधी येणार याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती देशाचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. सरकारकडून जुलै २०२१ पर्यंत देशातील २५ कोटी जनतेला करोनाची लस दिली जाऊ शकते असं त्यांनी म्हटलं आहे. संडे संवाद या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले “जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सरकारडे ४०० ते ५०० कोटी डोस उपलब्ध होती. त्यातील २५ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण होईल” हा अंदाज हर्षवर्धन यांनी वर्तवला आहे.

आणखी काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री ?
सरकार करोनावरच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी २४ तास काम करतं आहे, करोनाची लस आल्यानंतर वितरण प्रणालीचंही काम सुरु आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला करोना लस कशी दिली जाईल ही आमची प्राथमिकता आहे. करोना लशीच्या संदर्भात उच्चस्तरीय तज्ज्ञांची एक समिती कार्यरत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जगभरात करोनाचा कहर सुरुच आहे. अमेरिकेनंतर भारतात तो सगळ्यात जास्त आहे. सोबतच करोनावर लस शोधण्यासाठीही जगभरात प्रयत्न सुरु आहेत. भारतात सध्या करोनावरची लस शोधण्याचं काम तीन कंपन्या करत आहेत. यामध्ये भारत बायोटेक कोवॅक्सिन, जायडस कॅडिला जायकोव-डी आणि ऑक्सफर्डची करोना वॅक्सिन यांचा यात समावेश आहे. सीरम आणि ऑक्सफर्ड मिळून ही लस तयार करत आहेत. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. इतर दोन लशींच्या चाचण्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर आहेत.