पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही; शास्त्रज्ञांच्या होकारानंतर लसीकरण

नवी दिल्ली : करोना प्रतिबंधक लशीसाठी फार काळ थांबावे लागणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असल्याने पुढील काही आठवडय़ांत लस उपलब्ध होऊ शकेल. तज्ज्ञांनी हिरवा कंदील दिल्यानंतर लगेच लसीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत दिली.

लसीकरणाचे प्राधान्यक्रमही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक आदी करोनायोद्धे, तर पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा, सफाई कामगार हे आघाडीचे योद्धे, गंभीर व्याधिग्रस्त व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. या प्राधान्यक्रमाची यादी राज्यांकडून मागवली जात आहे. राज्यांच्या सूचनेनुसार लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाणार असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली.

शारीरिक अंतर नियम, मुखपट्टीचा वापर हे करोना प्रतिबंधक नियम कोणत्याही परिस्थितीत पाळले गेले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

दोन कोटी करोनायोद्धय़ांचे लसीकरण

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक एक कोटी आरोग्यसेवक आणि करोना लढय़ातील आघाडीचे योद्धे असे दोन कोटी लोकांचे लसीकरण केले जाईल, अशी माहिती सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सादरीकरणात देण्यात आली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे सादरीकरण केले. जुलैपर्यंत २० ते २५ कोटी व्यक्तींचे लसीकरण केले जाईल आणि त्यासाठी लशीच्या ४० ते ५० कोटी मात्रा वापरल्या जातील, अशी माहिती यापूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली होती.

किमतीसाठी राज्यांशी चर्चा

जनआरोग्याला अधिक प्राधान्य दिले जाईल आणि त्यानुसार किंमत ठरवली जाईल, असे सांगत पंतप्रधानांनी किमान किमतीला लस बाजारात उपलब्ध होईल, असे सूतोवाच केले. लशीच्या किमतीबाबत प्रश्न असणे स्वाभाविक आहे. याबाबतीत राज्यांशी चर्चा केली जात असल्याचे मोदी म्हणाले. भारतात तीन देशी लशींसह एकूण आठ लशींची मानवी चाचणी घेतली जात आहे; पण कमीत कमी किमतीत आणि सर्वात सुरक्षित लस कोणता देश उपलब्ध करून देऊ शकेल याकडे जगाचे लक्ष असून त्या दृष्टीने भारतातील लशींकडे पाहिले जात असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

दांडगा अनुभव, सुविधाही

अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद येथे लसनिर्मितीच्या प्रक्रियेची आपण भेट देऊन माहिती घेतली आहे. अन्य देशांपेक्षा भारताकडे लस उत्पादन करण्याची सर्वाधिक क्षमता असून लसीकरणाचा अनुभवही दांडगा आहे. त्यासाठी आपल्याकडे देशव्यापी यंत्रणाही उपलब्ध आहे. तिचा वापर करोना लसीकरणासाठी केला जाईल. या लसीकरणासाठी शीतकोठारांची गरज लागेल. राज्यांच्या मदतीने ही व्यवस्था उभारली जात आहे. शिवाय, लसीकरणासंदर्भात ऑनलाइन यंत्रणाही उभारण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

अफवांपासून दूर राहा!

व्यापक लसीकरण होते तेव्हा अफवा पसरवल्या जाऊ शकतात. त्या जनविरोधी, राष्ट्रविरोधी असतात. त्याबद्दल लोकांना जागृत करा, अफवांपासून त्यांना दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी राजकीय नेत्यांना केले आणि त्यांनाही सूचना पाठवण्याची विनंती केली. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय आदी १३ नेत्यांशी त्यांनी दूरसंवाद माध्यमाद्वारे चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, अर्जुन मेघवाल, व्ही. मुरलीधरन आदी या बैठकीत उपस्थित होते. गेल्या दोन आठवडय़ांमध्ये मोदी यांनी लसीकरणाच्या संभाव्य प्रक्रियेसंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी चार बैठका घेतल्या आहेत.

आशेचे वातावरण..

करोनाविरोधातील लढय़ासाठी केंद्र सरकारने कृतिगट तयार केला आहे. लसीकरणासाठीही राष्ट्रीय तज्ज्ञ गटाकडे जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यात तंत्रज्ञ, केंद्रीय अधिकारी आहेत. ते राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून काम करीत आहेत. देश तसेच स्थानिक स्तरावरील लसीकरणाचा कोणताही निर्णय सामूहिकरीत्या घेतला जाईल. करोनाविरोधातील लढाई शास्त्रीय दृष्टिकोनातून लढण्यात आली. त्यामुळे देशात प्रतिदिन करोना चाचण्यांची संख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त होत आहे. करोनामुक्त होणाऱ्यांचा दरही अधिक असून मृत्यूचे प्रमाण कमी आहे. फेब्रुवारी-मार्चमधील भयग्रस्त वातावरण ते डिसेंबरमधील विश्वासाचे आणि आशेचे वातावरण हा किती तरी मोठा टप्पा देशवासीयांनी पार केला आहे. हा लोकसहभाग, शास्त्रीय दृष्टिकोन, सहकार्य यापुढेही अपेक्षित आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले..

’डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक, पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा, सफाई कामगार या आघाडीच्या योद्धय़ांबरोबरच गंभीर व्याधिग्रस्त, ज्येष्ठ नागरिकांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण.

’करोना लस किमान किमतीत बाजारात उपलब्ध होईल, परंतु किमतीबाबत राज्यांशी चर्चा सुरू आहे.

’अन्य देशांपेक्षा भारताकडे लस उत्पादनाची सर्वाधिक क्षमता, लसीकरणाचा अनुभवही दांडगा आहे. त्यासाठी आपल्याकडे देशव्यापी यंत्रणाही उपलब्ध आहे.

’व्यापक लसीकरणाच्या वेळी अफवा पसरवल्या जाऊ शकतात. त्या राष्ट्रविरोधी असतात, त्याबद्दल राजकीय नेत्यांनी लोकांना जागृत करावे, अफवांपासून त्यांना दूर ठेवावे.

’फेब्रुवारी-मार्चमधील भयग्रस्तता ते डिसेंबरमधील आशादायी वातावरण हा मोठा टप्पा आपण पार केला आहे. हा लोकसहभाग, शास्त्रीय दृष्टिकोन, सहकार्य पुढेही अपेक्षित आहे.