देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरु लागल्याचं चित्र आहे. देशात आज सलग सातव्या दिवशी नव्याने बाधित आढळणाऱ्या करोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या आत आहे. आरोग्य मंत्रालयाने याविषयीची सविस्तर आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात गेल्या २४ तासात एक लाख ३४ हजार १५४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर दोन लाख ११ हजार ४९९ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १७ लाख १३ हजार ४१३ वर पोहोचली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आता दोन कोटी ६३ लाख ९० हजार ५८४ झाला आहे.

आणखी वाचा- करोनामुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य

देशात काल दिवसभरात करोनामुळे २ हजार ८८७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा आता तीन लाख ३७ हजार ९८९ वर पोहोचला आहे. तर देशातला मृत्यूदर सध्या १.१९ टक्के इतका आहे.

देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता २२ कोटी १० लाख ४३ हजार ६९३ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशातल्या एकूण २४ लाख २६ हजार २६५ नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी २१ लाख ९० हजार ९४१ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचा आकडा दोन लाख ३५ हजार ३२४ इतका आहे.