संपूर्ण संसद अधिवेशनादरम्यान ‘गोंधळा’चा अनुभव घेतलेल्या राज्यसभेचं वातावरण गुरुवारी काहीसं वेगळं दिसलं. हमीद अन्सारी यांचा राज्यसभेतील शेवटचा दिवस होता. त्यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचाही राज्यसभेतील अखेरचा दिवस होता. त्यांना निरोप देताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या भाषणांनी सभागृह भावूक झालं होतं. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी येचुरी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव हे निरोपाच्या भाषणादरम्यान भावूक झाले. यावेळी त्यांनी येचुरींविषयीची आठवण सांगितली. १९९४ मध्ये माकपचे सरचिटणीस कॉ. सुरजीत यांच्यासह दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा येचुरी हा खूपच चांगला मुलगा आहे. भविष्यात हा मुलगा यशाचं शिखर गाठेल, असं सुरजीत म्हणाले होते. ते बोलले ते पुढील काळात खरंच ठरलं, अशी आठवण यादव यांनी आपल्या भाषणातून सांगितली. संसदेच्या घटनेत दुरुस्ती होऊ शकते तर माकपनंही आपल्या घटनेत सुधारणा करून येचुरी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवावे, असंही त्यांनी सूचवलं. यावेळी त्यांनी येचुरी यांच्या संसदेतील भाषणांचाही उल्लेख केला.

येचुरी हे एक महान विचारवंत आणि लेखक आहेत. संसदेत होणाऱ्या चर्चांमध्ये ते नेहमीच आपलं योगदान देतात, अशा शब्दांत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी त्यांचा गौरव केला. यापुढील काळात येचुरी सभागृहात नसल्यानं महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेत ते सहभागी होणार नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक मुद्द्याचं सखोल ज्ञान असणारे नेते असून ते सभागृहात खूपच तयारीनं येतात. ते वाखाणण्यासारखंच आहे, असं जेडीयूचे खासदार अली अन्वर म्हणाले. केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनीही त्यांचं कौतुक केलं. येचुरी कधीही सत्तेत राहिले नाहीत. पण त्यांचे विचार आणि भाषणं खूपच वैचारिक, व्यवहार्य असतात. त्यावर विचार करणं भाग पडायचं, असं जेटली म्हणाले. १२ वर्षांत सभागृहाकडून खूप काही शिकायला मिळालं, असं येचुरी निरोपाच्या भाषणात म्हणाले.