विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमान आणि रेल्वे वाहतूक स्थगित

चीनमध्ये भीषण स्वरूपाच्या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर, त्या देशाने दोन मोठी शहरे बंद केली असून, या शहरांतून विमाने व रेल्वेगाडय़ा बाहेर जाण्यावर बंदी घातली आहे. यापूर्वीच इतर देशांमध्ये पसरलेला हा रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी हे अभूतपूर्व पाऊल उचलण्यात आले आहे.

वुहानमधील एका सी फूड आणि पशू बाजारपेठेतून उद्भवलेल्या या श्वसनसंबंधित विषाणूने (रेस्पिरेटरी व्हायरस) १७ बळी गेले आहेत. देशातील शेकडो लोकांना त्याची लागण झाली असून, अगदी दूरवर, म्हणजे अमेरिकेतही तो आढळून आला आहे.

हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या ११ दशलक्ष लोकसंख्येच्या वुहान शहरातील रहिवाशांना ‘फार महत्त्वाचे काम असल्याशिवाय’ बाहेर न पडण्यास गुरुवारी सांगण्यात आले असून, त्यापाठोपाठ वाहतूक बंदीचा आदेशही जारी करण्यात आला. वुहानमधील रेल्वे आणि विमान सेवा बेमुदत काळासाठी स्थगित करण्यात आल्या आणि शहराबाहेरच्या रस्त्यांवरील टोल वे बंद करण्यात आले. त्यामुळे, अडकून पडलेल्या लोकांमध्ये भीती व दहशत पसरली.

यानंतर काही तासांनी, शेजारच्या हुअंग्गांग शहरातील सार्वजनिक वाहतूक व रेल्वे सेवा मध्यरात्री स्थगित करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी जाहीर केले. ७.५ दशलक्ष लोकसंख्येच्या या शहरातील लोकांना बाहेर न पडण्यास सांगण्यात आले. शहरातील सर्व चित्रपटगृहे, इंटरनेट कॅफे व मध्यवर्ती बाजारपेठा बंद केल्या जाणार आहेत.

१.१ दशलक्ष लोकसंख्येच्या इझोऊ शहरातील रेल्वे स्थानक तात्पुरते बंद करण्यात आल्याचीही घोषणा गुरुवारी दिवसा करण्यात आली. चीनमधील ५७० हून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली असून, यापैकी बहुतांश रुग्ण वुहानमध्ये आढळले. वन्यप्राण्यांची अवैध विक्री करणारे या शहरातील सी फूड मार्केट हे या रोगाच्या प्रादुर्भावाचे केंद्र असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

सौदी अरेबियातील केरळी परिचारिकेला ‘करोना’ची लागण

नवी दिल्ली : सौदी अरेबियात काम करणाऱ्या केरळमधील एका परिचारिकेला करोनाव्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळल्यानंतर या संबंधात तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला केले आहे.

चीनमध्ये १७ बळी घेणाऱ्या करोनाव्हायरसची लागण सौदी अरेबियात काम करणाऱ्या एका केरळी परिचारिकेला झाल्याच्या वृत्तावर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले. प्रामुख्याने केरळमधून गेलेल्या आणि सौदीतील अल-हयात हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सुमारे १०० भारतीय परिचारिकांची तपासणी करण्यात आली असता, त्यातील एकीला करोनाव्हायरसची लागण झाल्याचे आढळले. तिच्यावर असीर नॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत आहे, असे ट्वीट त्यांनी केले. तिला शक्य ती मदत करण्याची सूचना आपण भारतीय दूतावासाला केल्याचे त्यांनी सांगितले.

हे प्रकरण सौदी अरेबियाकडे मांडावे, तसेच या परिचारिकेला तज्ज्ञांमार्फत उपचार मिळतील हे निश्चित करावे, असे आवाहन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना करणारे पत्र केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला लिहिले आहे. चीनमधून येणाऱ्या लोकांना विमानतळांवर तपासणीला सामोरे जावे लागेल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले.  तुम्ही भारतात याल, तर तपासणीला सामोरे जावे लागेल, असे मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले. चीनमधील भारतीयांच्या मदतीसाठी तेथील भारतीय दूतावासाने हॉटलाइन स्थापित केल्या आहेत.