तामिळनाडूचा ‘दाऊद’ अशी ओळख असलेला कुख्यात गुंड डॉन श्रीधर धनपालन याने शरण येण्याची आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, तामिळनाडू पोलिसांनी पक्षपातीपणे कारवाई करू नये, अशी हमी त्याने मागितली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या खास व्हिडिओ मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केले आहे. श्रीधर धनपालन हा सध्या दुबईत असून, तेथे तो रिअल इस्टेटच्या व्यवसायात आहे. त्याचा दुबईतील बिझनेस व्हिसाची मुदत २०१७ मध्ये संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याने शरणागतीची इच्छा व्यक्त केली. तामिळनाडू पोलीस त्याला चकमकीत ठार मारतील, अशी भीती त्याला आहे. तामिळनाडूचे पोलीस महासंचालक किंवा एखाद्या मोठ्या पोलीस अधिकाऱयाने मला निःपक्षपाती कारवाईची हमी दिली, तर मी शरण येण्यास तयार आहे. माझ्यावर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांची सविस्तर चौकशी व्हावी. मी पूर्णपणे निर्दोष आहे. माझ्याविरोधातील कोणत्याही गुन्ह्यात तथ्य आढळून आले तर मी स्वत: आत्महत्या करेन. पोलिसांना माझा एन्काऊंटर करण्याची गरज भासणार नाही, असे श्रीधर धनपालनने मुलाखतीत म्हटले आहे.
दरम्यान, श्रीधर विरोधात ७ खुनांसह ४३ विविध गुन्हे दाखल असून, चेन्नईच्या रिअल इस्टेटमध्ये त्याची सुमारे ५०० कोटींची गुंतवणूक आहे. दुबईतूनच तो या व्यवहारांची सूत्रे हाताळतो.