हिवाळ्यातही चारधाम यात्रा सुरू ठेवण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला असून पर्यटन उद्योगाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. मागील वर्षी राज्यात आलेल्या महाप्रलयामुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडून पडली होती. सरकारच्या या निर्णयामुळे ही अर्थव्यवस्था मजबूत होण्यात मदत होईल, अशी आशा पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली.
गंगोत्री व यमुनोत्री धाम तसेच यमुना खोऱ्यातील हॉटेल व्यावसायिकांची एक बैठक उत्तरकाशीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यावसायिकांनी हिवाळ्यातही चारधाम यात्रा सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. सरकारच्या या निर्णयामुळे या भागातील नागरिकांसाठी रोजगारांच्या संधी वर्षभर उपलब्ध होतील, असे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले. सहा महिन्यांसाठी बंद असलेली ही यात्रा आता वर्षभर सुरू राहाणार असल्यामुळे लोकांच्या मनात मोठा उत्साह निर्माण झाला आहे, असे गंगोत्रीचे आमदार विजयपाल सिंग यांनी सांगितले.