देशासाठी तो निर्णय अपशकुनी – मनमोहन सिंग

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळे झाले असून या निर्णयाला दोन वर्षपूर्ण झाल्याने सरकारने त्यावर माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली असतानाच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशासाठी हा अपशकुनी निर्णय असून हे रुग्ण मानसिकतेचं लक्षण आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे.

मनमोहन सिंग म्हणाले, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नांचा परिणाम आता स्पष्ट दिसायला लागला आहे. याचा देशातील प्रत्येक व्यक्तीवर वाईट परिणाम झाला आहे. मोदी सरकारने आता असे कोणतेही आर्थिक पाऊल उचलता कामा नये, ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या संदर्भात अराजकतेची स्थिती निर्माण होईल. मोदी सरकारने २०१६मध्ये अनेक त्रुटींसह गांभीर्याने विचार न करता नोटाबंदीचे पाऊल उचलले होते. आज याला दोन वर्षे पूर्ण झाली असून भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजासोबत केलेल्या या अरिष्टाचा परिणाम सर्वासमोर आला आहे. देशातील छोटय़ा व्यापाऱ्यांचा व्यवसाय अजूनही नोटाबंदीच्या झटक्यातून सावरू शकलेला नाही. नोटाबंदीचा विपरीत परिणाम हा नवे रोजगार निर्माण होण्यावर झाला आहे. या निर्णयामुळे पायाभूत सुविधा आणि बिगर बँकिंग आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कुऱ्हाड कोसळल्याचेही सिंग यांनी म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली – अरुण जेटली

नोटाबंदीचा निर्णय देशाच्या अर्थव्यस्थेला आलेली मरगळ झटकण्यासाठी घेण्यात आला होता. काळा पैसा बाहेर यावा, हा या कठोर निर्णयाचा मुख्य हेतू होता. ज्यांनी देशाबाहेर काळा पैसा जमा केला होता तो सरकारी तिजोरीत जमा करण्यास सांगितले होते. ज्यांनी तो केला नाही अशांवर आम्ही कारवाईही केली आहे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. नोटाबंदीच्या निर्णयाला दोन वर्षे झाली आहेत. त्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निर्णयावर टीका केली. ज्यावर उत्तर देत जेटलींनी हा निर्णय देशहितासाठीच घेतला होता, असा खुलासा केला.

अरुण जेटलींपाठोपाठ रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनीही हा निर्णय देशहिताचाच होता त्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले आहे. नोटाबंदीचा निर्णय आर्थिक पारदर्शकता आणण्यासाठीच घेतला होता. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराशी दोन हात करणे सरकारला शक्य झाले. तसेच काळ्या पैशावरही अंकुश लावता आला. भारताला भ्रष्टाचाराच्या जोखडातून सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला होता. हा निर्णय कठोर होता हे मान्य आहे मात्र, तो देशहितासाठीच घेण्यात आला होता, असेही गोयल यांनी म्हटले आहे.

हे तर क्रूर षड्यंत्र – राहुल

नोटाबंदी हे विचारपूर्वक केलेले एक  क्रूर षड्यंत्र होते. हा एक गंभीर घोटाळा असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुटा—बुटातील मित्रांसाठी काळा पैसा पांढरा करण्याची ही योजना आहे, अशी खोचक टीका ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. हा निर्णय मोदींच्या बडय़ा मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी घेतला होता. यामध्ये कुठलेही देशहित नव्हते. नोटाबंदीचे समर्थन करताना केलेल्या या कृतीला देशाच्या भल्याचा विचार असल्याचे सांगणे हा देशाचा अपमान असल्याचेही राहुल यांनी म्हटले आहे.