नव्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री झालेले राजनाथ सिंह यांनी शहिदांना दिलेल्या सॅल्यूटच्या पद्धतीवर एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने आक्षेप घेतला आहे. इतकेच नव्हे राजनाथ यांच्याबरोबर तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनीही चुकीच्या पद्धतीने शहिदांना सलामी दिल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. या प्रकारामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

लेफ्टनंट जनरल एच. एस. पनाग यांनी ‘द प्रिंट’ या न्यूज पोर्टलवर लिहिलेल्या लेखातून हा आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी म्हटले की, राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तिन्ही सैन्य दालांच्या प्रमुखांसह दिल्लीतील वॉर मेमोरिअलला भेट दिली. दरम्यान, या चौघांनी शहिदांना हाच उंचावून सॅल्यूटही मारला. मात्र, ही सॅल्यूट करण्याची पद्धत चुकीची असून ती जर्मनीतील नाझी सैन्याच्या पद्धतीप्रमाणे देण्यात आली होती आणि हा शहिदांचा अपमान असल्याचे पनाग यांनी म्हटले आहे. यामध्ये सॅल्यूट करण्याच्या प्रोटोकॉलचे पालनही झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ले. जन. पनाग यांनी लेखात म्हटले की, सैन्य दलात सॅल्यूट करण्याला खूपच महत्व असते. सैनिकांचा नियमित अभ्यास, शिस्त आणि आदेशाचे सक्तीने पालन करण्याचे प्रतिक म्हणून सॅल्यूटकडे पाहिले जाते. त्याचबरोबर सैन्यात रँकप्रमाणे समोरच्याला सॅल्यूट करण्याची पद्धत असते. त्यामुळे सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच जर ढिल्या स्वरुपात सॅल्यूट दिला तर ते नव्या जवानांसाठी रोल मॉडेल कसे बनू शकतील? असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, संविधानिक दस्तावेजांमध्ये वॉर मोमोरिअरला कशा प्रकारे सॅल्यूट दिला पाहिजे याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच जर चुकीच्या पद्धतीने सॅल्यूट करण्यात आला तर त्यासाठी काय शिक्षा असेल याचीही माहिती यात नाही. मात्र, असे असले तरीही सॅल्यूट योग्य प्रकारेच व्हावा याची काळजी सैन्याकडून घेतली जाते.