दिल्लीत १४ वर्षांच्या मुलाने अंध वडिलांपायी चक्क सुप्रीम कोर्टाची बोगस वेबसाईट आणि आदेशाची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी मुलाच्या वडिलांना अटक केली असून मुलगा सध्या जामिनावर बाहेर आहे.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार दिल्लीत राहणाऱ्या अंध प्राध्यापकाने महाविद्यालयातील गैरव्यवहारांविरोधात तक्रार केली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच स्ट्रस्टींविरोधात त्यांची तक्रार होती. मात्र, या तक्रारींची दखल घेतली न गेल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टानेही याचिका फेटाळून लावली. या सर्व प्रकाराने ते हताश झाले. शेवटी अंध प्राध्यापक आणि त्यांच्या मुलाने नवी शक्कल लढवली. त्याने वडिलांच्या सुचनेनुसार सुप्रीम कोर्टाची बोगस वेबसाईटच तयार केली. सुप्रीम कोर्टाने वडिलांच्या बाजूने निकाल दिल्याचा बनाव त्याने रचला. यासाठी आदेशाची बोगस प्रत तयार केली. या आदेशाची प्रत त्यांनी दिल्लीतील जिल्हा सत्र न्यायालयाला दिली. तिथे दखल घेतली न गेल्याने त्यांनी दिल्ली हायकोर्टाकडे आदेशाची प्रत दिली. दिल्ली हायकोर्टाने याची दखल घेत तातडीने सुनावणीसाठी प्रकरण हाती घेतले. मात्र, सुनावणीदरम्यान मुलगा आणि त्याच्या वडिलांचे बिंग फुटले.

पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली असून सध्या ते तिहार जेलमध्ये आहेत. तर मुलगा जामीनावर बालसुधारगृहातून बाहेर आला आहे. मात्र, मुलाने केलेला गुन्हा पाहता त्याला काही महिने बालसुधारगृहात ठेवावे आणि त्याचे समुपदेशन करावे, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली आहे. या मुलाने त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनाही पोलिसांच्या बोगस ईमेल आयडीवरुन मेल केला होता. त्याला शाळेतून काढून टाकण्यासंदर्भातील हा मेल होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.