आम आदमी पक्षातील ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून हाकलल्यानंतर आता त्यांची पक्षातूनही हकालपट्टी करण्याची मागणी करणारे पत्र पक्षाच्या नवनिर्वाचित ६७ आमदारांनी पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. विविध माध्यमांमधून यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यादव आणि भूषण हे दोघेही पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप या आमदारांनी पत्रातून केला आहे. दोन दिवसांपूर्वीच पक्षाचे राष्ट्रीय नेते मनिष सिसोदिया, गोपाल राय, संजय सिंग यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या दोघांवर वेगवेगळे आरोप ठेवले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत या दोघांनीही पक्षाच्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया यांनीही याच स्वरुपाचा आरोप केला होता. त्यानंतर आता दिल्लीतील आमदारांनी या दोघांच्या हकालपट्टीची मागणी केल्यामुळे दिवसेंदिवस आपमधील संघर्ष चिघळत चालला असल्याचे दिसते आहे.
करवालनगरमधील पक्षाचे आमदार कपिल मिश्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सर्व आमदार स्वेच्छेने या पत्रावर स्वाक्षरी करीत असल्याचे सांगितले.
आपल्यावर कारवाई करावी, यासाठी आपमधील वरिष्ठ नेते दिल्लीतील आमदारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप यादव यांनी केला होता. त्यापार्श्वभूमीवर कपिल मिश्रा यांनी आमदारांवर कोणीही दबाव टाकत नसल्याचे म्हटले आहे.