दिल्लीतील पंचशील पार्क येथे ३९ वर्षांच्या एअर होस्टेसने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पती आणि सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप एअर होस्टेसच्या नातेवाईकांनी केला आहे.

पंचशील पार्क येथे राहणारी अनिसिया बत्रा (वय ३९) ही लुफ्तांसा एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस म्हणून कामाला होती. शुक्रवारी संध्याकाळी अनिसियाने पतीला मेसेज करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले. यानंतर अनिसिया चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. अनिसियाचा पती मयांक सिंघवीने तातडीने इमारतीच्या गच्चीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अनिसियाने उडी मारली होती.

अनिसियाचे वडील सैन्यातील निवृत्त अधिकारी असून अनिसियाच्या भावाने मयांक सिंघवी आणि त्याच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. अडीच वर्षांपूर्वी अनिसियाचे मयांकशी लग्न झाले होते. हनीमूनसाठी दोघेही दुबईत गेले होते. तेव्हा देखील मयांकने अनिसियाला दारु पिऊन मारहाण केली होती, असे अनिसियाचा भाऊ करण बत्रा याने म्हटले आहे. मयांकला दारुचे व्यसन होते आणि यासाठी तो अनिसियाकडे पैशांचा तगादा लावायचा, असे करणचे म्हणणे आहे.

मयांक आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात अनिसियाच्या वडिलांनी गेल्या महिन्यात हौज खास पोलिसांकडे लेखी तक्रारही दिली होती. अनिसियाला काही झाल्यास यासाठी सिंघवी कुटुंबीय जबाबदार असतील, असे त्यांनी यात म्हटले होते. पोलिसांनी अनिसियाच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मयांक सिंघवीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.