एकतर्फी प्रेमातून लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या करणारा मेजर निखील राय हांडा याला पोलिसांनी मेरठमधून बेड्या ठोकल्या आहेत. २०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुमारे ५०० विश्रामगृहांमध्ये शोध घेतल्यानंतर २० तासांमध्ये मेजर निखील रायला अटक करण्यात यश आले. हत्येनंतर निखील पुन्हा घटनास्थळी गेला होता, पण पोलिसांना बघून तो तिथून मेरठला पळाला होता.

दिल्लीत शैलजा द्विवेदी (वय ३५) यांची शनिवारी हत्या झाली होती. शैलजा यांचे पती हे लष्करात मेजर म्हणून कार्यरत असून ते कामानिमित्त बाहेर असतात. तर शैलजा या दिल्लीतील कँटोन्मेंट परिसरात राहत होत्या. २०१५ मध्ये शैलजा यांचे पती नागालँडमधील दीमापूर भागात ड्यूटीवर असताना शैलजा यांची निखीलशी ओळख झाली होती. त्यावेळी शैलजा या पतीसह दीमापूरमध्ये राहत होत्या. मेजर निखील हांडा हा त्यांचा शेजारी होता. २०१७ मध्ये दोघांची ओळख वाढली. निखीलचे शैलजा यांच्यावर एकतर्फी प्रेम होते. शैलजा यांचे पती हे संयुक्त राष्ट्राच्या शांती सैन्यात गेल्यानंतर निखीलने शैलजांवर लग्नासाठी दबाव टाकला. शैलजा यांना एक मुलगा असून पतीला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न कर, असा तगादा निखीलने लावला होता.

कशी केली हत्या?
शनिवारी सकाळी आठ वाजता शैलजा आणि निखील हांडा यांच्यात फोनवर बोलणे झाले. यानुसार दोघांनी लष्करी रुग्णालयाजवळ भेटायचे ठरवले. निखीलचा दीड वर्षांचा मुलगाही याच रुग्णालयात दाखल होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास दोघेही रुग्णालयाबाहेर भेटले. यानंतर शैलजा निखीलच्या कारमध्ये बसली. दोघेही कँटोन्मेंटच्या दिशेने निघाले. दुपारी एकच्या सुमारास दोघांमधील वाद टोकाला पोहोचला आणि निखीलने चाकूने शैलजावर वार केले. रक्तबंबाळ शैलजा कारमधून बाहेर आली आणि ती रस्त्यावरुन चालू लागली. यादरम्यान निखीलने हा अपघात असल्याचे भासवण्यासाठी कारने शैलजाला चिरडले.  यानंतर निखील तिथून पळून गेला. काही वेळाने तो पुन्हा घटनास्थळी आला पण पोलिसांना बघून पुन्हा तिथून पळून गेला. कारवरील रक्ताचे डाग त्याने कापडाने पुसले.

२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले
शैलजा यांचे पती मेजर अमित द्विवेदी यांनी निखीलवर संशय व्यक्त होता. निखीलच्या कुटुंबियांनाही तो कुठे गेला, याची माहिती नव्हती. निखीलच्या मोबाईलचा लोकेशनही शैलजा यांची हत्या झाली त्या परिसरातच होता, असे समोर आले. या सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे  निखील हाच मुख्य संशयित होता. पोलिसांनी निखीलच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेतला असता तो मेरठमध्ये असल्याचे समजले. मेरठमधील सुमारे ५०० विश्रामगृहांमध्ये पोलिसांनी त्याचा शोध घेतला. २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. अखेर एका ठिकाणी निखील पोलिसांच्या जाळ्यात अडकला.