दिल्लीतील बुराडी भागातील एकाच कुटुंबातील ११ सदस्यांच्या रहस्यमयी मृत्यू प्रकरणी आणखी काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. अंधश्रद्धेपायी या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या करुन जीवन संपवल्याचे ठोस पुरावे समोर आले आहेत. आत्महत्या करण्याआधीचे या कुटुंबाचे शेवटच्या क्षणाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. या ११ जणांच्या मृत्यूमध्ये कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीचा सहभाग नसून त्यांनीच आपल्या आत्महत्येची तयारी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे.

भाटिया कुटुंबाच्या घराजवळचे हे सीसीटीव्ही फुटेज असून यामध्ये एक महिला तिची मुलगी आणि दोन मुले स्टुल आणि वायर घरी घेऊन जाताना दिसत आहेत. आत्महत्येसाठी याच वायर आणि स्टुलचा वापर करण्यात आला तसेच गेल्या ११ वर्षातील अकरा डायऱ्या पोलिसांना सापडल्या आहेत. डायरीमध्ये जो मजकूर लिहिलेला आहे आहे त्यावरुन अंधश्रद्धेतून या आत्महत्या झाल्याची शक्यता आहे.

आपण जे करतोय त्यामुळे आपला मृत्यू होईल असे या कुटुंबाला वाटले नव्हते. ललितच्या वडीलांचा आत्मा येऊन आपल्याला वाचवेल असे त्या कुटुंबाला वाटत होते. शेवटच्या डायरीतील शेवटचे वाक्य असे होते कि, एका कपमध्ये पाणी भरुन ठेवा. जेव्हा त्या पाण्याचा रंग बदलेल ते मी प्रगट होऊन तुम्हाला सर्वांना वाचवीन. आत्महत्येच्या दिवशी हे वाक्य त्या डायरीमध्ये लिहिले होते.

या कुटुंबातील सर्वात लहान मुलगा ध्रुव (१२) आणि शिवम (१५) दोघे खाली असणाऱ्या फर्निचरच्या दुकानात गेले तिथून त्यांनी वायर विकत घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. रात्री एकच्या सुमारास हा सर्वांनी मिळून सामूहिक आत्महत्या केली. हे कुटुंब २००७ पासून अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचं समोर येत आहे.

पोलिसांनी घरात तपासणी करताना २००७ मधील जुन्या नोट्स सापडल्या. घरातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतर हाताने या नोट्स लिहिण्यात आल्या होत्या. ‘मृत्यूमुळे घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मुलगा ललित भाटिया सर्वात जास्त धक्क्यात होता’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.