दिल्ली सरकारने महिलांसाठी बस आणि मेट्रोचा प्रवास मोफत केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. दिल्ली परिवहन मंडळाच्या बस, क्लस्टर बसेस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली. याशिवाय शहरात ७० हजार सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, ‘दिल्ली परिवहन मंडळाच्या बस, क्लस्टर बसेस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार. जेणेकरुन महिला सुरक्षित प्रवास करु शकतील. तसंच वाढीव तिकिट दराची चिंता न करता आपल्याला बस किंवा मेट्रो ज्याने हव्या त्या पर्यायाने प्रवास करु शकतात’.

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी ज्या महिलांनी तिकीट दर परवडतात, ज्यांना तिकीट खरेदी करणं शक्य आहे त्यांनी याचा लाभ घेऊ नये अशी विनंती केली आहे. ‘अशा अनेक महिला आहेत ज्यांना मेट्रो किंवा बसने प्रवास करणं परवडतं. ज्यांनी तिकीट खरेदी करणं शक्य आहे त्यांनी याचा लाभ घेऊ नये. आम्ही आवाहन करतो ज्यांना शक्य आहे त्यांनी तिकीट खरेदी करावं. ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांना लाभ घेऊ द्यावा’.

‘डीटीसी आणि मेट्रोमध्ये कशाप्रकारे अंमलबजावणी केली जाऊ शकते याची माहिती मिळवण्यासाठी मी सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगितलं असून अधिकाऱ्यांना एका आठवड्याचा वेळ दिला आहे. दोन ते तीन महिन्यात अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही लोकांकडूनही सूचना मागवल्या आहेत’, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

‘आम्ही केंद्र सरकारकडे तिकीटांचे दर वाढवू नका अशी विनंती केली होती, पण त्यांनी मान्य केली नाही. आमच्यात ५०-५० टक्के भागीदारी असून वाढीव तिकीट दरांवर ५०-५० टक्के सबसिडी घ्यावी असं सांगितलं होतं. पण तेदेखील त्यांनी मान्य केलं नाही. जो काही भार पडेल तो दिल्ली सरकार घेईल. यासाठी आम्हाला मान्यता घेण्याची गरज नाही’, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.