करोनाच्या दुसऱ्या लाटेपुढे हतबलता स्पष्ट दिसू लागली आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. देशाची गंभीर स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दहा राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडुतील मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे गाऱ्हाणं मांडलं. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ऑक्सिजन प्लांटचा ताबा लष्कराच्या हाती देण्याची सूचना केली. राज्यांना ऑक्सिजन लवकर मिळावा यासाठी भारतीय लष्कराची मदत घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं. तर मुख्यमंत्री असूनही काहीच करू शकत नसल्याची व्यथाही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मांडली.

Oxygen Shortage: चीनचा मदतीचा हात; पण भारताची मात्र पाठ

“हवाई मार्गाने सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. ऑक्सिजन एक्स्प्रेसची सुविधा दिल्लीत सुरु झाली पाहिजे. त्याचबरोबर देशात लस एकाच किंमतीत देणं आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यांना वेगवेगळ्या किंमती का?”, असा प्रश्नही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत उपस्थित केला.

ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्याचा विचार

देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंता वाढवणारी आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारतात तीन लाखांहून अधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ३२ हजार ७३० करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत देशात दैनंदिन रुग्णवाढीचा नवा जागतिक उच्चांक नोंदवण्यात आला आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यात आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे.