पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघड झाल्यानंतर इतरही घोटाळे समोर येत आहेत. रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांनीही ३ हजार ६९५ कोटींचा घोटाळा केला. त्यापाठोपाठ आता ओरिएन्टल बँकेलाही एका ज्वेलरी निर्यातदाराने ३९० कोटींचा चुना लावल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील हिरे व्यापारी आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या द्वारकादास सेठ इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने हा घोटाळा केला आहे. दिल्लीतल करोलबाग भागात ही कंपनी आहे. या कंपनीच्या चार संचालकांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हे चौघेही मागील १० महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे ते परदेशात पळून गेले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्समध्ये हा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्या संदर्भात बँकेने सहा महिन्यांपूर्वीच तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. रीता सेठ, कृष्ण कुमार सिंह, रवी सिंह आणि द्वारकादाससेठ इंटरनॅशनल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारकादाससेठ इंटरनॅशनलने ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या बँकेतून २००७ ते २०१२ या कालावधीत ३९० कोटींचे कर्ज घेतले. हे कर्ज घेताना लेटर ऑफ क्रेडिटचा वापर करण्यात आला होता. मौल्यवान वस्तू आणि सोने यांच्या खरेदीसाठी हे कर्ज घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. द्वारकादास सेठ इंटरनॅशनल या प्रा. लिमिटेड कंपनीने बोगस कागदपत्रांचा आधार घेत हे पैसे परदेशात पोहचवले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामागचे वास्तव काय आहे हे शोधणे आता सीबीआयपुढेच आव्हान असणार आहे.

नीरव मोदी ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून फरार झालेला आहे. अशातच देशातल्या इतर बँकांमध्येही घोटाळे झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. रोटोमॅक कंपनीच्या मालकाने ७ बँकांना चुना लावल्याचे प्रकरण ताजे असतानाच ओरिएन्टल बँकेलाही चुना लागल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेने तक्रार दिल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले हा प्रश्नही उपस्थित होतोच आहे. या प्रकरणात बँकेचे काही कर्मचारी सहभागी आहेत का? याचाही शोध घेतला जातो आहे.