दिल्लीकर मतदारांनी भाजपचा ध्रुवीकरणाचा प्रयत्न फोल ठरवत आम आदमी पक्षाच्या (आप) विकासाच्या धोरणाला एकतर्फी कौल दिला. लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मते देणाऱ्या दिल्लीने विधानसभेत मात्र सलग तिसऱ्यांदा ‘आप’ला निवडून दिले. दिल्लीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. भाजपाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे ट्विटवरुन अभिनंदन केलं आहे. मात्र मोदींच्या या शुभेच्छांवरुन कॉमेडियन कुणाल कामराने फिल्मी स्टाइल टीका केली आहे.

काय म्हणाले मोदी?

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी रात्री मोदींनी ट्विटवरुन आपचे आणि केजरीवाल यांचे अभिनंदन केलं. “दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आप आणि श्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन. दिल्लीतील नागरिकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा,” असा शुभेच्छा संदेश मोदींनी ट्विट केला आहे.

कुणालचा फिल्मी टोमणा

पत्रकार अर्बन गोस्वामीबरोबर वाद घातल्यामुळे चर्चेत असणारा कॉमेडीयन कुणाल कामराने मोदींच्या याच शुभेच्छांवरुन त्यांना टोला लगावला आहे. मोदींचे ट्विट कोट करुन रिट्विट करताना कुणालने यावर भाष्य केलं आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील ब्रेकअप साँग म्हणून लोकप्रिय असणाऱ्या, ‘मेरे सैयाँ जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया’च्या चालीवरच कुणालने तीन ओळी ट्विट केल्या आहेत. “दिल पे शाहीन बाग रखते हुवे मुहं पे मेकअप कर लिया, कम्युनॅलिझमसे दिल्लीने आज ब्रेकअप कर लिया” असा टोला कुणालने भाजपाला लगावला आहे.

आणखी वाचा – भाजपाच्या पदरात ‘शाही’ निराशा!; दोन वर्षात सहा राज्यांमध्ये मोठे पराभव

शाहीन बागचा भाजपाला फटका

भाजपने शाहीन बागविरोधी भूमिका घेत दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शाहीन बाग हा मुद्दा म्हणून पुढे आणला होता. शाहीन बाग मुद्द्यावरुन भाजपा हिंदू-मुस्लीम असे धार्मिक भेदाचे स्वरूप आणल्याची भावना मुस्लीमबहुल मतदारांमध्ये निर्माण झाली होती. याचा फटका भाजपा बसल्याचे दिल्लीच्या निकालांनी दाखवू दिलं. दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत भाजपला शाहीन बागचा जोरदार धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे.