निवडणूक आयोग आणि आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नोटीस बजावली आहे. केजरीवाल यांचा उमेवादीर अर्ज रद्द व्हावा यासंदर्भात काँग्रेस नेत्या किरण वालिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावरणी दरम्यान ही नोटीस बजावण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे रहिवाशी नसून त्यांचे नाव मतदार यादीत फसवणूक करून नोंदविण्यात आल्याने त्यांची उमेदवारी रद्द केली जावी अशी याचिका वालिया यांनी दाखल केली होती. इतकेच नव्हे तर, आपण गाझियाबादमध्ये स्थायिक असल्याचे प्रतिज्ञापत्र केजरीवाल यांनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पटियाला न्यायालयात सादर केले होते. तसेच जुलै २०१४ रोजी ‘टिळक लेन’वरील आपले अधिकृत निवासस्थान सोडल्याचेही केजरीवाल यांनी याआधी मान्य केल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. केजरीवाल यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये दिल्लीत मतदार यादीत आपले नाव येण्यासाठी वल्लभभाई पटेल मार्ग, रफी मार्ग येथील पत्त्यावरून निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला होता. परंतु, निवडणूक आयोगाने तो रद्द ठरवला होता. मग केजरीवालांनी त्यांचे नाव बीके दत्त कॉलनीतील पत्त्यावर स्थलांतरीत करण्यासाठी वेगळा अर्ज दाखल केला. परंतु, निवडणूक आयोगाने याआधीच वल्लभभाई पटेल मार्गावरील पत्त्यावरून केजरीवालांचा अर्ज फेटाळून लावला असल्याने त्यांचे नाव दुसऱया पत्त्यावर स्थलांतरीत होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा दावा वालिया यांच्या याचिकेत करण्यात आला आहे. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवालांना नोटीस पाठवली असून ४ फेब्रवारी रोजी यावर अंतिम निकाल अपेक्षित आहे.