काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी दाखल केलेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या बदनामी खटल्याच्या सुनावणीत व्यक्तिगत उपस्थितीतून मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने सूट दिली आहे. स्मृती इराणी यांनी ६ जून २०१४ रोजी कनिष्ठ न्यायालयाने पाठवलेले समन्स रद्द करण्याची मागणी केली असून, संजय निरूपम यांची तक्रारही रद्दबातल करण्याची विनंती केली आहे त्यावर न्या. सुरेश कैत यांनी निरूपम यांना नोटीस पाठवली आहे. स्मृती इराणी यांना कनिष्ठ न्यायालयात व्यक्तिगत उपस्थितीतून सूट देण्यात येत आहे. न्यायालयाने याबाबत इराणी यांच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर सुनावणीसाठी १३ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. स्मृती इराणी यांच्या वतीने बाजू मांडताना अतिरिक्त महाधिवक्ता मनिंदर सिंग व वकील अनिल सोनी यांनी सांगितले, की इराणी यांनी निरूपम यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केल्यानंतर निरूपम यांनी इराणी यांच्यावर दहा महिन्यांनी खटला दाखल केला आहे. निरूपम हे काँग्रेसचे माजी खासदार असून, त्यांनी इराणी यांच्यावर २० डिसेंबर २०१२ रोजी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दूरचित्रवाणीच्या चर्चेत त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने बदनामीचा खटला दाखल केला आहे.