देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय सुविधांचा तुटवडा भासू लागला आहे. दिल्लीतही ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. अशावेळी दिल्ली सरकारने बँकॉकवरुन ऑक्सिजनचे १८ टँकर्स मागवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हवाई दलाची विमाने देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

हे टँकर्स यायला उद्यापासून सुरुवात होणार असल्याचं केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. केंद्र सरकारशी यासंदर्भात होणारी चर्चा सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. फ्रान्समधून २१ रेडी टू युज ऑक्सिजन प्लांट्स मागवण्यात आले असून त्यांचा वापर लगेच करता येणार आहे.  वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हे प्लांट्स बसवण्यात येतील अशी माहितीही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणतात, “आम्ही देशातल्या काही मोठ्या उद्योगपतींनाही मदतीसाठीची पत्रे पाठवली होती. त्यांनीही मदत करण्याचं मान्य केलं आहे. पण त्यांनी आपलं नाव जाहीर होऊ नये अशी अट ठेवली आहे”. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला मदत केल्याबद्दल अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योगपती, सेवाभावी संस्था आणि मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

दिल्लीतली परिस्थिती आता नियंत्रणात येत आहे. दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारच्या टीमने एकत्र मिळून खूप कष्ट केल्याचंही त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, “केंद्र सरकारही ऑक्सिजन आयात करणार असून ५ टँकर्स खास दिल्लीसाठी मागवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दिल्ली सरकार येत्या एक महिन्यात एकूण ४४ ऑक्सिजन प्लाँट बसवणार आहे. त्यापैकी २१ प्लांट्स फ्रान्सकडून  येणार असून ८ प्लांट्स केंद्र सरकार बसवणार आहे. तर उरलेले सर्व प्लांट्स दिल्ली सरकार बसवणार आहेत”.