मेडिकल कोर्सेसच्या अॅडमिशनसाठी घेतल्या गेलेल्या नीट-२०२० परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये शोएब आफताब या विद्यार्थ्याने ७२० पैकी ७२० गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. याचवेळी दिल्लीच्या आकांक्षा सिंह हिने देखील याच परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळवले. मात्र, तिला पहिली रँक मिळू शकली नाही. काय आहे याबाबतचा नियम जाणून घेऊयात.

खरंतर विविध परीक्षांमध्ये विद्यार्थी अनेकदा एकसारखे गुण मिळवत असतात. मात्र, महाविद्यालयांमधील एकूण जागा आणि त्यासाठी लागणारी गुणवत्ता यादी अर्थात मेरिट लिस्ट बनवताना मोठी समस्या निर्माण होते. ही अडचण सोडवण्यासाठी अनेक बाबींचा विचार करुन विशिष्ट नियम तयार केले जातात. याचप्रकारे नीट परीक्षेत समान गुण आल्यास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) विशिष्ट टायब्रेकिंग धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार, विद्यार्थ्यांचे समान गुण आल्यास त्यांचे वय, विषयांमधील गुण आणि चुकीच्या उत्तरांची संख्या या बाबींचा विचार केला जातो. त्यामुळे शोएब आणि आकांक्षा यांच्यामध्ये शोएबने बाजी मारली आणि पहिली रँक मिळवली, तर आकांक्षाला दुसऱ्या रँकवर समाधान मानावे लागले.

टाय-ब्रेकर धोरणांतील निकषांचा वापर

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अधिकाऱ्यांनी सांगितले, “एकसारखे गुण असल्यास पहिल्यांदा केमिस्ट्री आणि त्यानंतर बायोलॉजीच्या गुणांची तुलना केली जाते. जर दोन्ही विषयांत समान गुण असतील तर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या चुकीच्या उत्तरांचा विचार केला जातो. या ठिकाणीही निर्णय होऊ शकला नाही तर मग वयाच्या आधारे यावर अंतिम निर्णय घेतला जातो.”

तीन ते सहाव्या रँकसाठीही हेच धोरण वापरले

याच धोरणाचा वापर करुन तूम्मला स्निकिथा (तेलंगाणा), विनीत शर्मा (राजस्थान), अमरिशा खैतान (हरयाणा) आणि गुत्थी चैतन्य सिंधू (आंध्र प्रदेश) या विद्यार्थ्यांची रँकिंग निश्चित करण्यात आली. कारण या चारही विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७१५ गुण मिळाले होते. त्यामुळे त्यांना टाय-ब्रेकरच्या नियमानुसार अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहावी रँक प्रदान करण्यात आली.

दरम्यान, प्रथम रँक मिळवणाऱ्या शोएब ने म्हटलं की, “मला कधीही वाटलं नव्हतं की मी नीटच्या परीक्षेत पहिला येईल. माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या आईला देईन कारण तिने कायमच मला डॉक्टर बनण्यासाठी प्रेरित केलं आणि ती माझ्यासोबत उभी राहिली.” शोएबची आई सुल्ताना रजिया या गृहिणी असून वडील शेख मोहम्मद अब्बास यांचा एक छोटासा व्यवसाय आहे.