नोटाबंदीमुळे सामोरे जावे लागणाऱ्या समस्या या प्रसववेदनांप्रमाणे असून याचे अंतिम फळ बाळाच्या जन्माप्रमाणे सुखदायी असेल, असे विधान केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले. ते नवी दिल्लीत भाजपच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना त्यामुळे सामोरे जाव्या लागणाऱ्या अडचणींची तुलना स्त्रीला बाळाच्या जन्मावेळी सोसाव्या लागणाऱ्या प्रसववेदनांशी केली. नोटाबंदीमुळे लोकांना काहीप्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, या अडचणी स्त्रीला प्रसूती दरम्यान सहन कराव्या लागणाऱ्या वेदनांप्रमाणे आहेत. त्यानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज पहिल्यांदा ऐकल्यानंतर जो आनंद होतो तशाचप्रकारचा आनंद नोटाबंदीमुळे झालेल्या परिणामांच्या अंतिम चरणात अनुभवायला मिळेल, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. याशिवाय, नोटाबंदीचे उद्दिष्ट हे रोकडरहित (कॅशलेस) नसून कमी रोकड ( लेसकॅश) असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा झालेल्या पैशाचा वापर सैन्यदलाला अधिक बळकट करण्यासाठी तसेच शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी केला जाईल, असेही त्यांनी म्हटले. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व राहुल गांधी यांना उपरोधिकपणे टोलाही हाणला. मी दोन लोकांच्या भाषणांची खूप उत्सुकतेने वाट पाहत असतो. त्या व्यक्ती म्हणजे मनमोहन सिंग व राहुल गांधी. मनमोहन सिंग बोलले याचा मला आनंद असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शुक्रवारी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना विरोधकांवर टीका केली. खरे तर नोटाबंदीचा निर्णय १९७१मध्येच घ्यायला हवा होता. पण तेव्हा तो न घेतल्याने देशाचे अपरिमित नुकसान झाल्याचा दावा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘काँग्रेसला पक्ष महत्त्वाचा वाटला, पण मला देश महत्त्वाचा वाटतोय.’ बेनामी मालमत्तांविरोधात लवकरात लवकर कारवाई सुरू करण्याचे सूतोवाचही त्यांनी या वेळी केले.

मोदींनी तत्कालीन अर्थमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यातील संवादच खासदारांना ऐकविला. ‘काळा पैसा रोखण्यासंदर्भात वांच्छू समितीने नोटाबंदीची शिफारस करणारा अहवाल दिला होता. यशवंतराव तो अहवाल घेऊन इंदिराजींकडे गेले आणि शिफारशी ऐकविल्या. त्यावर इंदिराजी ताडकन् म्हणाल्या, ‘आपल्याला काय निवडणुका लढवायच्या नाहीत काय?’ यशवंतरावांना पंतप्रधानांच्या विधानाचा मथितार्थ समजला आणि शिफारस कायमचीच वगळली गेली. तेव्हाच जर नोटाबंदीचा निर्णय घेतला असता तर देशाचे अपरिमित नुकसान झाले नसते.’ वांच्छू समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी डाव्यांचे ज्येष्ठ नेते व पश्चिम बंगालचे प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेल्या ज्योती बसूंनीही केल्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले, ‘उनके लिए दल बडा था, हमारे लिए देश बडा है. मागील सरकारने टूजी, कोळसाकांड, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये भ्रष्टाचार केल्याने विरोधक त्यांच्यावर खवळले होते. पण आता सरकारने काळ्या पैशांविरुद्ध पाऊल उचलले म्हणून विरोधक संतापले आहेत, असे मोदींनी म्हटले.