पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी (दि.२४) सांयकाळी कॅबिनेट बैठकीचे आयोजन केले आहे. नोटाबंदीच्या निर्णयावरून विरोधी पक्षाच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित झाल्यानंतर पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. संसदेतील पंतप्रधानांच्या गैरहजेरी व त्यांनी नोटाबंदीवर स्पष्टीकरण करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे. जोपर्यंत पंतप्रधान चर्चेत सहभागी होत नाहीत तोपर्यंत राज्यसभेचे कामकाज चालू देणार नसल्याचे काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांपासून पंतप्रधान पळून जात असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधी पक्षांनी संसदेत ‘पंतप्रधान पळून गेले’ अशा घोषणा देण्यात आल्या. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेतील गोंधळ बंद झाल्यास सरकार सकारात्मक चर्चेस तयार असल्याचे सांगितले आहे. विरोधी पक्षाकडून नोटाबंदीच्या निर्णयावरून संभ्रम पसरवला जात असल्याचेही जेटलींनी म्हटले.

तत्पूर्वी, विरोधकांनी नोटाबंदीच्या निर्णयाला केलेल्या विरोधात गोंधळ जास्त आणि तथ्ये कमी होती, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात घेतलेल्या निर्णयावर सरकार ठाम आहे. विरोधकांना फक्त कामकाजात अडथळा आणायचा, त्यांना कोणतीही चर्चा करायची नाही, असेही जेटली यांनी म्हटले.
‘पहिल्या दिवशी नोटाबंदीवर कोणत्याही पूर्व अटीशिवाय चर्चा झाली. त्यानंतर विरोधकांकडून अवाजवी अटी मागण्या करण्यात आल्या,’ असे जेटली यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हटले. ‘जो पक्ष कधीकाळी अनेक घोटाळांमध्ये बरबटला होता, तो पक्ष आज नोटाबंदीला विरोध करतो आहे. ज्यांना कधी घोटाळे ही घोडचूक वाटली नाही, त्यांना आता नोटाबंदीचा निर्णय घोडचूक वाटते आहे,’ असे म्हणत जेटली यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.