‘पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय क्रांतीकारी आहे. यामुळे भ्रष्टाचाराला, काळ्या पैशाला मोठ्या प्रमाणात नक्कीच आळा बसेल,’ असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. आम्ही गेल्या काही वर्षांपासून ही मागणी करत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. सरकारने २००० रुपयांची नवी नोट चलनात आणली असून, त्याचे वितरणही अनेक ठिकाणी सुरू आहे. नागरिकांना त्यांच्याकडील पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

‘मागील सरकारांनी काळ्या पैशांविरोधात गंभीरपणे पावले उचलली नाहीत. आताच्या सरकारच्या निर्णयाने घेतलेला निर्णय हा धाडसी असून, त्यामुळे भ्रष्टाचाराला , काळ्या पैशाला आळा बसेल’ असे अण्णा हजारेंनी स्पष्ट केले.

‘आता सरकारने निवडणूक प्रक्रियेतील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी निवडणूक प्रक्रियेत मोठ्या सुधारणा कराव्यात. पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपासून या सर्व सुधारणांना सुरुवात व्हावी,’ अशी अपेक्षा अण्णा हजारेंनी व्यक्त केली.