भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्यात आली असून त्यांचे नाव व्हिसा व इमिग्रेशन व्यवस्थेच्या लूक आउट यादीत टाकण्यात आले आहे, त्यामुळे त्यांना आता व्हिसा मिळूच शकणार नाही.
मॅनहटन येथील अमेरिकी अधिवक्ता प्रीत भरारा यांच्या कार्यालयाने सांगितले, की सध्या तरी देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आलेले नाही. अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्तया जेन साकी यांनी सांगितले, की देवयानी खोब्रागडे यांच्यावरील आरोपात कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यांचे नाव लूक आउट सिस्टीममध्ये टाकण्यात आल्याने त्यांना व्हिसा मिळणार नाही. त्या मायदेशी गेल्या असल्या तरी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले जाऊ शकते. त्यांना जर अमेरिकेला भेट द्यायची असेल, तर थेट न्यायालयाच्या परवानगीवर ते अवलंबून राहील. खोब्रागडे यांचा विवाह भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक असलेल्या व्यक्तीशी झालेला असून त्यांना सहा व तीन वर्षे वयाच्या दोन मुली आहेत, त्यांनाही भारतात पाठवले जाणार आहे.
गुरुवारी देवयानी यांच्यावर न्यूयॉर्क न्यायालयात व्हिसा घोटाळा व काही तथ्यांचे चुकीचे सादरीकरण या दोन मुद्दय़ांवर आरोपपत्र ठेवण्यात आले .खोब्रागडे यांच्यावरील आरोप कायम राहणार असून अशा प्रकरणात नेहमीच्या प्रक्रियांचा अवलंब केला जाईल, असे सांगण्यात आले.
खोब्रागडे यांनी त्यांच्यावर व्हिसा प्रकरणी आरोप रद्द करण्याच्या मागणीसाठी अमेरिकी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने आपल्याला कारवाईपासून संरक्षण मंजूर केल्याने आरोप मागे घ्यावेत, असे खोब्रागडे यांचे वकील डॅनियल अरश्ॉक यांनी चार पानी याचिकेत म्हटले आहे. तर खोब्रागडे प्रकरणामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले असून ते सुरळीत करण्यासाठी भारताला बरेच प्रयत्न करावे लागतील, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी सूचित केले.