आपल्या वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. देशात गेल्या काही वर्षांपासून सांप्रदायिक ध्रुवीकरण वाढल्याचा हवाला देत जो सन्मान दलाई लामांना दिला जातो. तो सन्मान शंकराचार्यांना दिला जातो का, असा सवाल स्वरूपानंद सरस्वतींनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचे अनेक लोक आमच्याकडे येतात. पण आम्ही कधी कोणालाही वैयक्तिक कामाबाबत बोलत नाही, असे सांगत काँग्रेसी म्हणून आम्हाला शिवी तर दिली जाते. पण मी काँग्रेसी बनून कोणकोणते फायदे घेतलेत हेही सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळावर आपण निराश असल्याचेही ते म्हणाले.

‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी अनेक मुद्यांवर खुलेपणाने चर्चा केली. काँग्रेस समर्थक असल्याच्या आरोप करणाऱ्यांवर आपण नाराज असल्याचे ते म्हणाले. मला काँग्रेसी म्हणून शिवी दिली जाते, असे त्यांनी म्हटले. देशात सांप्रदायिक ध्रुवीकरण वाढल्याचे सांगत यामागे धर्म नव्हे तर राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन्ही पक्षांनी समजून घेतले पाहिजे की त्यांचे भांडण कशाबरोबर आहे. मी कोणाबरोबरही भेदभाव करत नाही असे सांगत जो सन्मान दलाई लामांना मिळतो तो शंकराचार्यांना आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोदी सरकारच्या कार्यकाळावर मी निराश आहे. मला अपेक्षा होती की, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतावरील गोमांस निर्यातीचा कलंक मिटेल. पण आजपर्यंत असे काही झालेले नाही. आम्हाला वाटले होते की, समान नागरी कायद्याला गती येईल. पण याबाबतही काहीच हालचाल नाही. काश्मीरची परिस्थितीही तशीच आहे. गंगा नदी तर कुठे सुधारली, असे ते म्हणाले.

शंकराचार्य म्हणाले, भारतात काही ठिकाणी गोहत्या बंदी आहे. पण अनेक राज्यांमध्ये हा प्रकार सुरूच आहे. अनेक ठिकाणी पोलिसांची भूमिकाच संशयास्पद आहे. गोहत्या मुसलमानांसाठी नव्हे तर डॉलरसाठी होत असल्याचे सांगत गोहत्या फक्त हिंदूंसाठी नव्हे तर मुसलमानांसाठीही असायला हवे, असे ठामपणे सांगितले. राममंदिर बाबत बोलताना ते म्हणाले, तुम्ही न्यायालयात तर काहीच करत नाहीत आणि जनतेला म्हणता आम्हाला मत देण्याची मागणी करता, हा धोका असल्याचे ते म्हणाले.