भाजपचा आरोप; रमजानदरम्यान मतदान तारखांवर ‘आप’, तृणमूलचा आक्षेप

लोकसभेच्या निवडणुका मुस्लीम लोक उपास करत असलेल्या रमजानदरम्यान होत असल्याच्या मुद्दय़ावर काही विरोधी पक्ष जाणूनबुजून वादंग निर्माण करत असल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला. निवडणुकीपूर्वी देशाला विभाजित करण्याचा हा ‘धार्मिक डाव’ असल्याची टीका पक्षाने केली.

हा समुदाय सत्ताधारी आघाडीविरुद्ध विरोधी पक्षांना पाठिंबा देतो. त्यामुळे रमजानच्या महिन्यात निवडणुका घेतल्याने मुस्लिमांची गैरसोय होईल आणि भाजपला फायदा होईल, असा दावा तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

ज्या काळात अनेक हिंदू लोक उपास करतात, तो नवरात्रीचा सणही निवडणुकांच्या काळात येतो, याकडे भाजपचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी लक्ष वेधले.

मुसलमान त्यांचे काम न करता रोझा ठेवत नाहीत. इस्लामही पूजेसाठी आपले काम थांबवण्यास सांगत नाही. नोकरीधंदा असलेले लोक रमजानच्या काळात कामावर जात नाहीत, असेही नाही. ते रोझा ठेवतात आणि त्यांचे कामही करतात. त्यामुळे अशा प्रकारचा वाद निर्माण करणे हे दुर्दैवी आहे, असे हुसेन म्हणाले. जे लोक देशाला धार्मिक आधारावर विभाजित करू इच्छितात, तेच या मुद्दय़ावर वादविवाद करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

२०१८ साली कैराना येथील लोकसभेची पोटनिवडणूक रमजानच्या काळात घेण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या निवडणुकीत एकत्र आलेल्या विरोधी पक्षांकडून भाजप पराभूत झाला होता.

निवडणुकीच्या वेळापत्रकातून संपूर्ण महिना वगळला जाऊ शकत नसल्यामुळे निवडणुका रमझानच्या काळातही घेतल्या जात आहेत; तथापि मुख्य सणांच्या तारखा आणि शुक्रवार मतदानाचे दिवस म्हणून टाळण्यात आले आहेत, असे या वादावर प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगाने यापूर्वी सांगितले होते.