तमिळनाडूतील विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. विद्याथ्र्यांना डेटाकार्डसह विनामूल्य संगणक टॅब्लेट देण्याचे आणि राज्यात स्थानिकांना ७५ टक्के नोकऱ्या देण्यासाठी कायदा करण्याचे आश्वासन द्रमुकने दिले आहे.

हिंदूंच्या मंदिरात तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या एक लाख लोकांना २५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य, प्रसूती रजेत वाढ आणि आर्थिक साहाय्य, इंधनाच्या दरात कपात आणि ‘नीट’वर बंदी घालण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासनही द्रमुकने दिले आहे.

आपले सरकार सत्तेवर आल्यास ज्या कुटुंबात पहिलाच पदवीधर झाला असेल तर अशांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल, लहान शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात येईल आणि खासगी क्षेत्रात आरक्षणाचा आग्रह धरला जाईल, असेही द्रमुकचे अध्यक्ष स्टालिन यांनी जाहीरनामा जाहीर करताना सांगितले.