अमेरिकेसह जगभरात थैमान घातलेल्या करोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्वाच्या नियोजित गोष्टी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्यातच ४६ व्या G7 शिखर संमेलनाचाही समावेश झाला आहे. कारण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण ही शिखर परिषद सध्या सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलत असल्याचे शनिवारी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. विशेष म्हणजे या विशिष्ट देशांच्या गटाच्या संमेलनासाठी ट्रम्प भारतासह ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण कोरियाला देखील आमंत्रित करणार आहेत. हे G7 शिखर संमेलन १० जून ते १२ जून दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार होते.

ट्रम्प म्हणाले, “आपण G7 शिखर संमेलन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलत आहोत. ही काही देशांची एक जुनी संघटना असली तरी मला वाटत नाही की, G7 संमेलन हे संपूर्ण जगाचं प्रतिनिधीत्व करु शकेल. त्यामुळे जगात सध्या काय घडत आहे हे नेमकं कळू शकणार नाही. त्यामुळे या संमेलनाला आपण भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण कोरिया या देशांनाही निमंत्रित करणार आहोत.”

दरम्यान, व्हाइट हाउसच्या सामरिक संवाद विभागाच्या संचालिका एलिसा एलेक्झेंड्रा फराह म्हणाल्या, “या द्वारे अमेरिका आपल्या पारंपारिक सहकाऱ्यांना सोबत घेणार आहे. कारण चीनच्या भविष्याबाबत चर्चा केली जावी.” त्याचबरोबर जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांच्या कार्यालयाकडून शनिवारी सांगण्यात आले की, “त्या या G7 शिखर संमेलनात तोपर्यंत सहभागी होणार नाहीत जोपर्यंत करोना विषाणूचा प्रसार संपत नाही.”

G7 ही संघटना जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात आघाडीवर असलेल्या अर्थव्यवस्थांच्या देशांची संघटना आहे. यामध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका, युके आणि कॅनडासहित सात देशांचा समावेश आहे. या सर्व देशांचे प्रमुख आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक आणि व्यापार विषयक मुद्द्यांवर दरवर्षी ही बैठक घेऊन चर्चा करतात. या वर्षी G7 बैठकीच्या (संमेलन) आयोजनाची आणि अध्यक्षतेची जबाबदारी अमेरिकेकडे आहे.

या G7 शिखर संमेलनाचे अध्यक्ष दरवर्षी एक किंवा दोन देशांच्या प्रमुखांना विशेष आमंत्रित म्हणून बैठकीसाठी प्रस्ताव पाठवतात. गेल्या वर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले होते. त्याचवेळी ट्रम्प यांनी पुढील वर्षी आम्ही भारताला निमंत्रण देऊ असे जाहीर करीत भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वलयाचे दर्शन घडवले होते.