रशियासंदर्भातील तपासाच्या प्रकरणात संभ्रम 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलास सिनेट समितीसमोर साक्षीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याच्या वृत्तामुळे आणि व्हाइट हाऊसने अध्यक्षांच्या चौकशीबाबतचा तपशील जाहीर करण्यास नकार दिल्याने बुधवारी रशियाच्या संदर्भातील तपासावरून अमेरिकेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

एका ज्येष्ठ रिपब्लिकन नेत्याने रशिया तपास हे बंद झालेले प्रकरण असल्याचे सांगितल्यानंतर ट्रम्प यांचा विरोधी डेमोक्रॅटिक पक्षासमवेतचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. महत्त्वाचा दस्तऐवज खुला करण्यास नकार दिल्याबद्दल देशाचे अ‍ॅटर्नी जनरल बिल बार यांना अवमान केल्याबद्दल दोषी धरण्यास सभागृहाच्या समितीने अॠुकूलता दर्शविल्याने संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

त्यानंतर रिपब्लिकनांच्या नेतृत्वाखालील सिनेट गुप्तचर समितीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलास, रशियाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाबाबतच्या तपासाचा भाग म्हणून साक्षीसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतला, असे अमेरिकेतील माध्यमांनी म्हटले आहे. या तपासामध्ये साक्षीसाठी अध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्याला पाचारण करण्याची ही पहिलीच घटना आहे. ट्रम्प यांच्या मुलाने स्वेच्छेने खासगीत समितीपुढे एकदा साक्ष दिली, तेव्हा त्याला रशियातील वकिलांसमवेत ट्रम्प टॉवर येथे झालेल्या बैठकीबाबत प्रश्नपत्रिका देण्यात आली.अध्यक्षांच्या मुलाशी कोणत्या विषयावर चर्चा करावयाची आहे ते समिती सदस्यांनी स्पष्ट केले नाही.