‘माझ्या उद्योगातही मी एच १ बी व्हिसा वापरून कर्मचारी ठेवले आहेत पण देशात आता हा प्रकार थांबला पाहिजे, मीही माझ्या उद्योगांमध्ये तो थांबवीन कारण एच १ बी व्हिसा पद्धतीमुळे अमेरिकी कर्मचाऱ्यांना नोक ऱ्या मिळत नाहीत व तो मोठा अन्याय आहे,’ असे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
‘अमेरिकी कामगारांना वगळून एच १ बी व्हिसाचा आधार घेत इतर देशांच्या विशेष करून भारताच्या कौशल्यप्राप्त कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणे चुकीचे आहे. टाटांच्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना भारतीय उद्योगात संधी मिळते, मग ते एच १ बी व्हिसा घेतात, आमच्या कंपन्या भारतीयांना संधी देतात, डिस्ने व इतर अमेरिकी कंपन्या असे करतात, डिस्ने कंपनीने अमेरिकी कर्मचाऱ्यांना काढून भारतीयांना घेतले होते,’ असे फ्लोरिडाचे सिनेटर व अध्यक्षपदाचे उमेदवार मार्क रूबियो यांनी सांगितले.
अध्यक्षीय उमेदवारीच्या निवडणुकीतील शेवटची चर्चा मियामीत सुरू झाली त्या वेळी व्हाइट हाउससाठीचे चारही दावेदार आमनेसामने आले. त्या वेळी ट्रम्प यांनी सांगितले, की एच १ बी व्हिसा मला माहिती आहे. त्याचा वापर मीही उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केला आहे. पण यापुढे तसे करणार नाही. ते अमेरिकी कर्मचाऱ्यांसाठी वाईट आहे.
मी उद्योगपती आहे व मला जे करणे अपेक्षित आहे तेच मी केले पाहिजे. अमेरिकी कर्मचाऱ्यांवर अन्याय करता कामा नये. ट्रम्प यांच्या मालमत्ता भारत, व्हर्जिनिया, इलिनॉइस, फ्लोरिडा, न्यूजर्सी, नेवाडा, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, कनेक्टीकट, हवाई, अमेरिका, कॅनडा, तुर्की, पनामा, दक्षिण कोरिया, फिलिपिन्स व उरूग्वे या देशांत आहेत.