तेलंगणामधील महाबुबनगर येथील पिलामरई नावाच्या ७०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाला वाळवी लागली आहे. वाळवीच्या संकटातून झाडाची मुक्तता करण्यासाठी झाडाच्या बाधित भागाला सलाइन लावण्यात आले आहे. तीन एकरामध्ये पसरलेले पिलामरई अथवा पिरला मारी नावाने ओळखले जाणारे हे विस्तिर्ण झाड पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. जगातील हे दुसऱ्या क्रमांकाचे विस्तिर्ण वडाचे झाड असल्याचे म्हटले जाते. या झाडाच्या एका फांदीला वाळवीने पोखरले असून, औषधोपचाराद्वारे वाळवी नष्ट करण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत.

झाडाची निगा घेण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी प्रचंड मेहनत घेत आहेत. झाडाचा जो भाग बाधित झाला आहे, तेथे प्रत्येक दोन मिटरच्या अंतरावर रासायनिक द्रव्य सोडण्यात येत आहे. झाडाच्या मुळांनादेखील रासायनिक खत मिसळलेली पाणी घालण्यात येत आहे. झाडाला वाळवीमुक्त करण्यासाठीच्या प्रयत्नांची माहिती वनाधिकारी चुक्का गंगा रेड्डी यांनी ‘दी टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राला देतांना सांगितले की, प्रथम झाडाच्या छिद्रांतून रासायनिक द्रव्य ओतण्यात आले. ते द्रव्य लगेचच बाहेर पडायचे, त्यामुळे ही पध्दत उपयोगी ठरली नाही. नंतर आम्ही सलाइनचा वापर करून औषध झाडात झिरपवू लागलो आणि ही पध्दत फायदेशीर ठरली.

डिसेंबरमध्ये झाडाच्या एका फांदीला वाळवीचा उपद्रव झाल्यापासून पर्यटकांना येथे येण्यास बंदी करण्यात आली आहे. अधिकारी झाडाला पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. झाडाची स्थिती उत्तम दिसत असून, लवकरच ते पूर्ववत होईल अशी अशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लवकरच पर्यटकांसाठी हे स्थळ खुले करू. तोपर्यंत त्यांना झाडापासून काही अंतरावर बांघण्यात आलेल्या कुंपणाबाहेर उभे राहून दुरूनच झाडाचे दर्शन घ्यावे लागेल, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.