समाजमाध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर भाष्य करणारा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयापासून त्यांच्या परदेश दौऱ्याचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. यासोबतच रिलायन्स जिओपासून विजय मल्ल्या यांच्याही नावांचा या व्हिडिओमधील गाण्यात वापर करण्यात आला आहे. १९९५ मध्ये आलेल्या आलिशा चिनॉयच्या ‘मेड इन इंडिया’च्या गाण्याच्या चालीवर ‘ईस्ट इंडिया कॉमेडी’ने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ २ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

या व्हिडिओमध्ये गायकांचा समूह मोदींचे नाव घेऊन एका व्यासपीठावरुन गायनाला सुरुवात करताना दिसतो आहे. ‘घूमते हैं सारी दुनिया, जापान से लेकर रशिया, ऍण्ड समटाईम ही स्टॉप ओवर इंडिया, अच्छे दिन का सपना, स्वच्छ होगा भारत अपना, इस मुन्नाभाई का सर्किट है अमित शाह, मेक इन इंडिया और ४जी फ्री दिया, ऑल थँक्स टू हिज फ्रेंड्स इन अँटिला,’ अशा ओळी गात या समूहाने पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे, अच्छे दिन, स्वच्छ भारत, जिओ अशा अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

‘ईस्ट इंडिया कॉमेडी’ने तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये विरोधकांचाही समाचार घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान मोदींकडून मिळणारी वागणूक, त्यांच्याकडे करण्यात आलेले दुर्लक्ष यावर ‘ईस्ट इंडिया कॉमेडी’ने विनोदी पद्धतीने निशाणा साधला आहे.