पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता गुजरातमधील ब्राह्मण समाजही त्याच मागणीसाठी पुढे सरसावला आहे. ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्टय़ा  दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवावे यासाठी या समाजाने राज्य सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.
ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याचा इशाराही समाजातील नेत्यांनी सरकारला दिला आहे. ब्राह्मण समाजातील ४०० उपजातींच्या प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर अखिल गुजरात ब्राह्मण समाजाने आपल्या मागण्या निश्चित केल्या असून त्यामध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी आरक्षण देण्याच्या मागणीचा समावेश आहे.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या हितासाठी मंडळ स्थापन करावे आणि शैक्षणिक क्षेत्रात ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी आरक्षण ठेवावे आदी मागण्याही समाजाने केल्या आहेत. सध्याच्या आरक्षण पद्धतीमुळे ब्राह्मणांना अनेक तोटे सहन करावे लागत असून ते इतरांपेक्षा पिछाडीवर जात आहेत, असे ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष शैलेश जोशी यांनी सांगितले.